‘जय संतोषी मां’ फेम अभिनेत्री बेला बोस यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना बेला बोस यांचं सोमवारी निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. बेला बोस यांनी साठ-सत्तरच्या दशकांत अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ‘शिकार’, ‘जीने की राह’ आणि ‘जय संतोषी मां’ यांसारख्या ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये बेला बोस यांनी आपल्या अभिनयाची छाप टाकली आहे. त्या उत्तम चित्रकार, कवयित्री आणि जलतरणपटूही होत्या. अशा ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
बेला बोस या मूळच्या कोलकात्यातील होत्या. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या मुंबईत स्थायिक झाल्या. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी नृत्यांगना म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रभुत्व मिळवले होते. 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मै नशे मै हूँ’ या चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर एका गाण्यातील नृत्यासाठी त्यांची निवड झाली होती. बंगाली रंगभूमीवर काम करत त्यांनी अभिनयाची कला अवगत केली. 1962 मध्ये त्यांनी ‘सौतेला भाई’ या चित्रपटात पहिल्यांदा गुरु दत्त यांची नायिका म्हणून मुख्य भूमिका साकारली. त्यांनी 200 हून अधिक हिंदी आणि प्रादेशिक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.