पोलीस आयुक्तांनी नवनीत राणांच्या आरोपांना दिलं उत्तर; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ

मुंबई : नवनीत राणा यांना प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून त्यांनीदेखील याची दखल घेत २४ तासात सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिलं नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत.
तसंच संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्विट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? असं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.