हंगाम अंतिम टप्प्यावर; ऊसतोड कामगार परतीच्या मार्गावर

संसारासोबत हा असतो बारदाणा
-ऊसतोडणीसाठी केवळ कामगारच उसाच्या फडात वास्तव्यास येत नाही तर त्यांच्याबरोबर ट्रॅक्टर, बैलजोडी, शेळ्या-मेंढ्या यांच्यासह संसारोपयोगी साहित्य असते. शिवाय या सहा महिन्यांत किमान २० ते ३० वेळा त्यांना इतर ठिकाणी वास्तव्य करावे लागते. आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कामगार परतीच्या वाटेवर आहेत.
पुणे : विक्रमी गाळप हे अभिमानाची बाब असली तरी अतिरिक्त ऊस आणि ऊसतोडणीसाठी शेतकर्यांची होत असलेली अडवणूक हे दोन मुद्दे चर्चेत राहिलेले आहेत. राज्यात यंदा विक्रमी उसाचे गाळप झाले असले तरी यामध्ये ऊसतोड कामगारांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
सहा महिने संसार उसाच्या फडात अन् सहा महिने आपल्या गावात लेकराबाळांत असेच काहीसे जीवन ऊसतोड कामगारांचे आहे. यामुळे काही ठिकाणी ऊसतोड कामगारांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे कामगारांनीच रात्रीचा दिवस केल्याने गाळप पूर्ण झाल्याचे म्हणत कळंब तालुक्यात कामगारांचा पोशाख, आहेर आणि नारळ देऊन केलेला सत्कार कसा विसरता येईल. यापूर्वी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख होती. पण आता मुकादम हे गावस्तरावर ऊसतोडीची टोळी बनवत आहेत. कामगारांचा कारखान्यांवरील मुक्काम वाढला होता. विविध अंगाने चर्चेत राहिलेला गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांपैकी अनेक साखर कारखान्यांवरील कामगारांनी आता परतीची वाट धरली आहे.
ऊस तोडणीमध्ये यंत्राचा वापर परिणामकारक ठरणारा होता. अवकाळी पाऊस झाल्याने यंत्राच्या सहायाने उसतोड शक्यच झाली नाही. कामगारांचा कोयताच कामी आला आहे. यंदा विक्रमी गाळप होण्यामागे या उसतोड कामगारांचे योगदानही महत्वाचे आहे. अनेक साखर कारखाने बंद झाले, त्यामुळे गाळप पूर्ण होणार का? अशी चिंता शेतकर्यांमध्ये असताना ऊस तोडणी मजूर गावाकडे परतू लागल्याने नवीच अडचण निर्माण झाली आहे.