कालिदासाचा आषाढ!

स्वाती पेशवे
एकदा कालिदास गणिकेबरोबर होता. तेव्हा श्लोकार्थ सांगणार्याला बक्षिसाच्या रूपाने राजाने मोठी रक्कम देऊ केली आहे, असे त्याला समजले. ‘कमले कमलोत्पति: श्रुयते न तु दृश्यते’ या श्लोकाचा अर्थ सांगणायाला भलीमोठी रक्कम मिळणार होती. गणिकेलाही प्रश्न सतावत होता. कालिदासाने दुसर्या क्षणी उत्तर दिले. ‘तव मुख्याम्भोजात कथमिन्दीवर द्वय,’ यामुळे हर्षभरित झालेल्या गणिकेने बक्षीस मिळावे, यासाठी कालिदासाचा वध करवला.
स्वाती पेशवे
का लिदास कधी जन्मला, हे ठामपणे कोणताही इतिहासकार सांगू शकत नाही. मात्र ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥’ या ओळी वाचल्या, की त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता बळावते. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी अलिप्त यक्षाने पर्वताच्या माथ्यावर ढग टेकलेले पाहिले तेव्हा त्याला खेळात हत्ती आल्यासारखे वाटले, असा पुढे त्याचा अर्थबोध होतो…
ज्येष्ठ पावसात भिजतो आणि जणू कायापालट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पावसाच्या ओढीने तळमळणारी मने सुखावतात. तप्त झळांनी भाजून निघालेले मुके जीव विसावतात. अनेक दिवसांची तहान भागल्यामुळे गाई-गुरे मनसोक्त हंबरतात. निसर्गात दाटू पाहणार्या हिरवाईला त्यांची ती साद असते. थोडक्यात, पावसाच्या आगमनाने शुष्कतेची जागा सजलता घेते आणि मांगल्याचे पाट वाहणार, या आशेनेच मनांना अंकुर फुटू लागतात. आताही आपल्या भावना काहीशा अशाच आहेत. अंदाज चुकवून थोड्या विलंबाने दाखल झाला असला तरी आता पावसाने बहुतांश भाग व्यापला आहे. लवकरच त्याची दमदार बॅटिंगही सुरू होईल आणि आषाढझड अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
आषाढ हा ऋतूकाळातला ओलाकंच महिना… आषाढातली झड काही विलक्षणच! सध्या हे चित्र काहीसे विस्कळीत अथवा अनियमित झाले असले तरी आषाढातले वातावरण अधिक रमणीय असते, हे नाकारण्यात अर्थ नाही. आषाढातला पहिला दिवस तर ‘महाकवी कालिदासदिन’ म्हणून साजरा होणारा एक संस्मरणीय दिवस. प्रत्येकाला कालिदासाचे समग्र चरित्र माहीत असते अथवा कालिदासाच्या काव्याची ओळख असते, असे ठासून सांगता येणार नाही. ‘आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी अलिप्त यक्षाने पर्वताच्या माथ्यावर ढग टेकलेले पाहिले तेव्हा त्याला खेळात हत्ती आल्यासारखं वाटले…’ असा त्याचा अर्थबोध समजतोे, तेव्हा अफाट कल्पनाशक्तीचे कौतुक वाटते आणि या अलौकिक कवीला समर्पित असणार्या आषाढातल्या पहिल्या दिनाविषयी ममत्व वाटायला लागते. महाकवी कालिदास आणि त्याचे अजरामर काव्य मेघदूत… नंतर याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची
उत्कंठा वाढू लागते.
कालिदासाची समृद्ध साहित्यसंपदा हा अनमोल ठेवा, पण एका कर्तव्यभ्रष्ट यक्षाची विकलता, विरह, आर्तता, व्याकुळता वर्णन करणार्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याचे जनमानसातले स्थान काही वेगळेच आहे. या काव्यात कालिदासाने एका यक्षाची विरही अवस्था, प्रेमातुरता, दु:खावेग या सर्वांचे मनोहारी वर्णन केले आहे. काव्यातला हा कर्तव्यभ्रष्ट यक्ष एक वर्षाची शिक्षा भोगतो आहे. अलकानगरीच्या राजाने त्याला शिक्षा म्हणून एका वर्षासाठी खूप दूरच्या रामगिरी पर्वतावर एकांतवास दिला. मात्र, हा काळ प्रियतमेपासून दूर राहावे लागल्यामुळे त्याच्यासाठी युगासमान आहे. प्रियतमेच्या विरहामुळे वेडापिसा झालेला हा शापित यक्ष तिच्यापर्यंत संदेश पोहोचवू इच्छितो. आपल्या मनातील विरहभावना व्यक्त करू इच्छितो. यासाठी त्याने आधार निवडला एका मेघाचा. पूर्वी पक्षी, वायू, मेघ यांच्यामार्फत सांगावा पोहोचवला जाई. ‘मेघदूत’ हे कालिदासचे खंडकाव्य अशाच एका संदेशाचे प्रतीक आहे. प्रियतमेला पाठवला गेलेला जगातला हा सर्वांगसुंदर संदेश आजही एक मनोज्ञ काव्य म्हणून ओळखला जातो. आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघालाच दूत बनवून कवी कालिदासने प्रियतमेला सांगावा धाडला आहे.
अंदाजे चौथे शतक ते सहावे शतक या काळात कालिदास हा महाकवी होऊन गेला असावा, असे मानले जाते. राजा विक्रमादित्याच्या दरबारातले ते एक लखलखते रत्न होते. मध्य प्रदेशमधल्या उज्जैन आणि काश्मीर या दोनच ठिकाणी त्याचे वसतीस्थान असल्याचे संशोधक मान्य करीत आहेत. कालिदासाच्या काव्यांमधून, नाटकांमधून पुढे येणारा निसर्ग, त्यात वर्णन केलेले ऋतूंचे सोहळे या दोन भूभागांशी मिळतेजुळते आहेत. कवी कालिदासाबद्दल अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत.
शेजारच्याच एका नगरीतल्या प्रधानाने कपट करून राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला.
या राजकन्येला विद्वानाशी विवाह करण्याची इच्छा होती. आपला पती प्रकांडपंडित असावा, या इच्छेने तिने स्वयंवर रचले होते. प्रधानाने कपटाने येड्यागबाळ्या कालिदासाला ज्ञानी पुरुषाचा वेष लेववला आणि मौनव्रत असल्याने हे महाशय खुणाद्वारेच बोलतील, असा युक्तिवाद करीत राजकन्येला भुलवले. राजकन्येनेही दोन-चार प्रश्न विचारून त्याची बुद्धी जोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालिदासाने त्याचा चुकीचा अर्थ लावत मुद्राभिनय आणि हातवार्यांच्या सहाय्याने उत्तर दिले. देखण्या आणि तरण्याबांड कालिदासाकडे आकर्षित झालेली राजकन्या या हातवार्यांचा सूक्ष्मार्थ लावत बसली आणि तिथेच फसली. तिने कालिदासाशी विवाह केला. पण पहिल्याच रात्री आपली घोर फसवणूक झाल्याचे ध्यानी येताच अद्वातद्वा बोलून पतीची निर्भर्त्सना केली. या सर्वामुळे व्यथित आणि अपमानित झालेला कालिदास कालीमातेला शरण गेला. असे म्हणतात, कालिदासाला प्रत्यक्ष कालीने दर्शन दिले आणि दिव्यज्ञान प्राप्त झाले.
अशा या महाकवी कालिदासाचे स्मरण आणि त्याच्या काव्यप्रतिभेचा सन्मान ‘कालिदासदिना’च्यानिमित्ताने होतो. महाकवी कालिदासाचे साहित्य अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. आजही त्याच्या सुभाषितांचा अभ्यास केला जातो. संस्कृत महाकाव्यांच्या या कर्त्याने ‘मेघदूत,’ ‘रघुवंशम,’ ‘कुमारसंभवम्’, ‘विक्रमोर्वशीयम्,’ ‘मालविकाग्नीमित्रम्,’ ‘अभिजातशाकुंतलम्’ आदी साहित्यनिर्मिती केली. देशादेशीच्या ज्येष्ठ साहित्यिकांनी कालिदासाचे साहित्य अभ्यासले. सिंहली, मंगोली, उजबेकी, जर्मन, फ्रेंच आदी भाषांमध्ये कालिदासाचे साहित्य अनुवादित झाले आहे. अशा या महान कविश्रेष्ठाच्या आठवणीत रमून आषाढाचा आनंद लुटू या.