“यामागचा तोच खरा मास्टरमाईंड…”, आमिर खानविरोधात कंगनाचा खळबळजनक दावा!
मुंबई | Kangana Ranaut On Aamir Khan – सध्या सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. तसंच या चित्रपटावरून चांगलांच वाद सुरू आहे. त्यामुळे अभिनेता आमिर खाननं ‘माझ्या चित्रपटाला बॉयकॉट करू नका’ असं सर्वांना आवाहन केलं आहे. तरीदेखील लोकांचा पारा मात्र चढलेला आहे. काही वर्षांपूर्वी आमिरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं, किरण रावनं भारताच्या विरोधात केलेलं वक्तव्य लोकांनी पुन्हा उकरून काढून लाल सिंग चड्ढा विरोधात सूर काढला आहे. याच दरम्यान, आता अभिनेत्री कंगना रणौतने आमिर खानविरोधात खळबळजनक दावा केला आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं म्हटलं आहे की, “लाल सिंग चड्ढाभोवती सध्या जे काही वादाचं चक्र सुरू आहे ते सगळं आमिरच्या मास्टरमाईंड मधूनच आलेलं आहे. त्याला माहित आहे, कॉमेडी चित्रपटाच्या सीक्वेलशिवाय कोणत्याच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवलेली नाही. दाक्षिणात्य सिनेमांनीच बाजी मारलेली आहे. हॉलीवूड रीमेक देखील डब्ब्यात गेलेत. हिंदी सिनेमावाल्यांनी लोकांची नस ओळखायला हवी. फक्त हिंदू-मुस्लिम वाद, प्रेम दाखवलं की झालं असं चालणार नाही. आमिरजींच्या pk सिनेमातून जे दाखवण्याचा प्रयत्न केला धर्माच्या नावाखाली ती फसवणूक होती प्रेक्षकांची. कृपया हे बंद करा”, असं कंगनानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, लाल सिंग चड्ढा हा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्प चित्रपटाचा रीमेक आहे. आमिरनं याचे अधिकृत हक्क मिळवण्यासाठी खूप खटाटोप केली आहे. या चित्रपटात करिना कपूर, आमिर खान, मोना सिंग,नागा चैतन्य असे कलाकार आहेत. तसंच हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.