तुनिषाच्या आत्महत्येवर कंगनाची प्रतिक्रिया; पंतप्रधानांना केली विनंती

मुंबई | Kangna Ranaut – टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. त्याप्रकरणी (Tunisha Sharma Suicide Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी तुनिषा शर्माच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार तुनिषाचा को-ॲक्टर आणि बॉयफ्रेंड शिझान खान याला गंभीर आरोप केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असताना त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत, त्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतनेही एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, पॉलिगॅमी अर्थात बहुविवाह आणि अॅसिड अटॅक अशा गुन्हांपासून महिलांना वाचवण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची विनंती सुद्धा केली आहे.
कंगनाची इन्स्टाग्राम पोस्ट
पोस्टमध्ये कंगना म्हणते, एक महिला प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकते. नातेसंबंध, प्रेम, लग्न, इतकंच नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीपासून वेगळं होणही सहन करू शकते. पण तिच्या नात्यात प्रेम नसणे ही गोष्ट ती सहन करू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीसाठी स्त्रीच प्रेम आणि तिची कमजोरी हे केवळ शोषण करण्यासाठीचा सोपा मार्ग असतो. तिचं वास्तव पूर्वासारख राहत नाही, कारण त्या नात्यात असलेली दुसरी व्यक्ती तिच्यावर भावनिक आणि शारीरिक अत्याचार करत असते हेच खरं.
पुढे ती म्हणते, ज्या मुलीला सत्य समजते त्यावेळी ती तिच्या विचारांवरही विश्वास ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत तिला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास त्रास होतो. तिचा सर्व गोष्टींवरुन विश्वास उडतो. तिचा स्वत:च्या विचारांवरुन तसंच इतरांच्याही विचारांवरुन विश्वास उडतो. त्यावेळी तिला जिवंत किंवा मृत राहण्याचाही कोणताही फरक पडत नाही. अशावेळी एखादी मुलगी आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी ती असं एकटीने करत नाही. ही एक हत्या असते. त्या हत्येला वैध कारण न देता कोणी मुलीशी संबंध तोडले तर तो दंडनीय गुन्हा मानला पाहिजे. महिलेवर अॅसिड हल्ला करणाऱ्यांना किंवा तिचे तुकडे करणाऱ्यांनाही तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ती पंतप्रधानांकडे करते.