कपिल शर्माने केला गोलमाल, कायद्याच्या कचाट्यात सापडला

मुंबई | प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मानं त्याच्या दमदार टायमिंग आणि खुमासदार विनोदाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याने ‘कपिल शर्मा कॉमेडी शो’ मधून आपले भरपूर मनोरंजन केले आहे. तसंच काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे कपिल शर्मा वादात सापडला होता. आता मात्र त्याच्या पुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्याच्या एका चुकीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
सध्या कपिल शर्मा त्याच्या टीमसोबत कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. कॅनडा टूर सुरू असतानाच कपिल शर्मावर ही वेळ आली आहे. त्याच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली असून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. कपिल शर्माने पैसे घेऊनही कॉन्ट्रेक्ट पूर्ण न केल्याचा हा आरोप आहे. हे प्रकरण 2015 मधील असून याबाबत आता तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या विरोधात साई यूएसए इंक यांनी तक्रार दाखल केली आहे. 2015 मध्ये कपिल शर्माने उत्तर अमेरिकामध्ये काही शोसाठी एक कॉन्ट्रेक्ट साइन केले होते. त्यासाठी त्याने पैसेही घेतले पण काँन्ट्रक्ट पूर्ण केले नाही. याविषयी अमेरिकेतील प्रसिद्ध शो प्रमोटर अमित जेटली म्हणाले, ‘कपिल शर्माने सहा शो करण्याचे कॉन्ट्रेक्ट केले होते. त्यासाठीची रक्कमही त्याला देण्यात आली होती. पण कपिल शर्माने एकही शो केला नाही. कपिल शर्माने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप पैसे परत केले नाहीत अन् शो ही केले नाहीत. कपिल शर्माकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही कपिल शर्मासोबत अनेकदा बोलण्याचा प्रयत्नही केला पण अखेर आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली’ सध्या हे प्रकरण न्यूयॉर्कमधील न्यायालयात आहे.