“सोशल मीडियामुळे कलाकारांचे स्टारडम…”, करण जोहरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
मुंबई | Karan Johar’s Statement In Discussion – प्रसिद्ध बाॅलिवूड निर्माता करण जोहर सध्या त्याच्या ‘काॅफी विथ करण’ या शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. तसंच करणने नुकतंच एका मुलाखतीत कलाकारांच्या स्टारडमबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यात त्याने सोशल मीडियामुळे स्टारडमचे स्वरूप बदललं असल्याचा खुलासा केला आहे.
करणने ‘अमर उजाला’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कलाकारांचे स्टारडम आणि त्यात झालेला बदल यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये तो म्हणाला, “सोशल मीडियामुळे कलाकारांचे स्टारडम, त्यांची प्रसिद्धी यांमध्ये खूप फरक पडताना दिसत आहे. आत्ताच्या पिढीला स्टारडम म्हणजे काय? हे कदाचित अनुभवता येणार नाही. यापूर्वी अभिनेते राजेश खन्ना यांच्यापासून अक्षय कुमारपर्यंत सगळ्यांचे स्टारडम होते. लहानपणी जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यायचे, तेव्हा ते कोणते कपडे घालणार आहेत हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. प्रत्येक ठिकाणी त्यांना पाहणं शक्य नव्हतं. फक्त प्रीमियर किंवा एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असल्यास त्यांचे फोटो पाहता यायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असायची.”
“सोशल मीडियामुळे चाहत्यांमधील आवडत्या कलाकाराबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची उत्सुकता संपली आहे. कारण आपल्या आवडत्या कलाकाराचे सगळे अपडेट सोशल मीडियावर उपलब्ध असतात. चित्रपटांबद्दल बोलायचे तर माझे वडील नेहमी म्हणायचे की, ‘यशस्वी होणारा चित्रपट हा चांगला चित्रपट असतो’. जेव्हा एखादा चांगला चित्रपट बनवला जातो आणि जर तो प्रेक्षकांना देखील आवडला, तर तो चित्रपट नक्की यशस्वी होतो. त्यामुळे सोशल मीडियामुळे जरी चाहत्यांची उत्सुकता कमी होत असेल, तरी चित्रपटांवर त्याचा परिणाम होतो असं मला वाटत नाही. चित्रपट चांगला असेल आणि प्रेक्षकांना आवडला तर नक्कीच तो यशस्वी होतो”, असंही करण म्हणाला.