ताज्या बातम्यारणधुमाळी

‘तातरतम्य ठेवूनच…’; अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं असता वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

सांगलीतल्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहित. आचमन करा…”, असं म्हणत मिटकरींनी मंचावर बसलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत पुढे बोलणं सुरु ठेवलं. “मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी मुलीचा बाप म्हणाला बसा साहेब कन्यादान आहे. म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना… आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हणाले मी बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली,” असं मिटकरी यांनी सांगितलं आहे.

यानंतर मिटकरी काही मंत्र म्हणाले. नंतर त्यांनी लग्न लावणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे डोळ्याला पाणी लावा असं सांगितलं. नंतर ते गुरुजींच्या शैलीमध्येच, “तुमचा हात माझ्या हातात द्या,” असं म्हणाले. हे ऐकून मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसू लागले. पुढे बोलताना मिटकरींनी, “आचमन करा, धुपम्, दिपम् नमस्कारम्…” असं म्हणत पुन्हा मंत्र म्हटले. मंत्र म्हणताना त्यांनी, “मम भार्या समर्पयामि” असं वाक्य म्हटलं. मिटकरींनी पुढे बोलताना, “मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. म्हटलं अरे येड्या ते महाराज असं म्हणतायत.. मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा.” यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. “आरारा… कधी सुधरणार आपण. ही लोक आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली,” असंही मिटकरी म्हणाले.

मात्र या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांनी मात्र माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यात प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर विचारलं असता ते संतापले आणि म्हणाले, “माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये