“…तर यांना भाजपमध्ये कुणीही स्थान देणार नाही”, किशोरी पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
मुंबई | Kishori Pednekar On CM Eknath Shinde – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
शिवसेना मराठी माणसाला संपवत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंवर ते सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना चारही बाजूंनी घेरलंय. तरीदेखील उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत नाहीये. ही खरी यांची पोटदुखी आहे”.
“उद्धव ठाकरेंवर टीका नाही केली, तर यांना भाजपमध्ये कुणीही स्थान देणार नाही. उद्धव ठाकरेंवर जेवढं जास्त बोलणार, तेवढा यांचा तिथला हिस्सा वाढत जाणार”, असा टोला देखील किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे.