“घर फिरलं की…”, ठाकरे, शिंदे, फडणवीसांच्या भेटीवर शिवसेनेची खोचक टीका
मुंबई | Kishori Pednekar – काल (21 ऑक्टोबर) मनसेच्या वतीनं दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. तसंच गेल्या काही दिवसांपासून मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यानं युतीच्या चर्चांना जास्तच उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवाजी पार्कमध्ये मागील 10 वर्षांपासून रोषणाई होत आहे. यात नवं काही नाही. मात्र यावेळी तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते एका मंचावर आले. पण मी नेहमीच म्हणते की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. इथे मात्र वासे अगोदर फिरले आहेत. आता घर फिरवत आहेत”, अशी खोचक टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “दहा वर्षांमध्ये यायला भेटले नाही, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मात्र मागील दहा वर्षात नेमकं काय मिळवलं, हे त्यांनी सांगितलं नाही. मतदारांनी हे किती पटत आहे हे दिसत आहे. त्यांना जे म्हणयाचं आहे ते म्हणून देत. मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्याना काय टोलेबाजी करायची ती करू द्या.”
“राजकारणाचे एवढे अध:पतन होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. नगरसेवक फुटणे, आमदार फुटणे, गट फुटणे हे जगात तसंच देशातही घडते. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे तरूण पिढीने, सुशिक्षित लोकांनी राजकारणात येऊ नये, असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र या समाजाला आदित्य ठाकरे नक्कीच छेद देतील. त्यांच्या चांगल्या वागणुकीनं ते चांगला आदर्श निर्माण करत आले आहेत”, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.