“उद्धव ठाकरेंची कोंडी करून…”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

मुंबई | Kishori Pednekar On Shinde Group – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामध्ये शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) टीकास्त्र सोडलं आहे. कायद्याच्या अडचणी निर्माण करून सर्व बाजूंनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना पक्षालाच संपवून टाकण्याचा विडा शिंद गट आणि भाजपनं उचलला आहे. राजकारणाचा सुसंस्कृतपणा संपत चालला आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
पुढे किशोरी पेडणेकरांनी ऋतुजा लटकेंच्या (Rutuja Latke) राजीनाम्याबाबतही भाष्य केलं. “काही कारणास्तव तुम्ही काम सोडणार असला तर पैसे भरून राजीनामा देऊ शकता. ऋतुजा लटकेंनी स्वच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांची महापालिकेतील वर्तणूकही चांगली होती. मात्र, एखाद्या लिपीकासाठी शिंदे गट इतका अट्टहास का करत आहे?”, असा सवालही पेडणेकरांनी विचारला आहे.
“शिवाजी पार्कवेळेही महापालिकेनं अरेरावी केली. पण, न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर पालिकेला तोंडावर पडण्याची वेळ आली. काही अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या 150 वर्षाचा इतिहास पुसला जात आहे. लटकेंच्या जागी अन्य उमेदवार दिल्यास त्याला पराभूत करण्याचा काहींना साक्षात्कार होतोय”, असा खोचक टोलाही पेडणेकरांनी लगावला आहे.