आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीसांनी भेट दिलेल्या, कोल्हापुराच्या कणेरी मठातील ५४ गायींचा मृत्यू

कोल्हापूर : (Kolhapur’s Kaneri Math 54 cows in Death) कोल्हापुरातील कणेरी मठातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल ५० ते ५४ गायींचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ३० गायी गंभीर आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गायींच्या मृत्यूबाबत माहिती देण्यावरुन मठाकडून लपवाछपवी करण्याचा प्रकार सध्या घडत आहे.

कोल्हापुरातील कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. येथे जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून यासाठी देशातून हजारो नागरिक येत आहेत. मठात भव्य अशी गायींची गोशाळा देखील आहे. या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने मठातील तब्बल ५० ते ५४ गायींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मठाकडून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून लाखो करोडो रुपये खर्चून मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला या कारणामुळे गालबोट लागलं आहे.

कोल्हापुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमकडून काल रात्रीपासून गायींवर उपचार सुरू आहेत. मात्र, मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारी देखील तयार नाहीत. मृत गायींचे पोस्टमार्टम करून त्याचा तपास केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. पर्यावरण आणि प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने रोज हजारो किलोचे जेवण वाया जात आहे. यामुळे यातील भाकरी चपातीचे ठीक ठिकाणी डोंगर झाले असून हेच सर्व अन्न येथील पशुंना खाऊ घातले जात आहे यामुळे कदाचित विषबाधा होऊन गायी दगावल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये