लाडक्या बहिणीचे पैसे वाढणार! मुख्यमंत्री शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट) रोजी देखील अनेक महिलांच्या खात्यावर दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवण्याबद्दल महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. नवी मुंबईत सिडकोच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. उलट लाडक्या बहिणीने सरकारची ताकद वाढवली, तर १५०० चे २००० पुढे अडीच हजार करु. द्यायची वेळ येईल, तेव्हा हात आखडता घेणार नाही. हे पैसे जनतेचे आहेत. पूर्वीच हफ्ते घेणारं सरकार होतं. हे बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारं सरकार आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आधीच्या सरकारने मेट्रो 3, अटल सेतू, कारशेड, समृद्धी हायवे प्रकल्प बंद केला होता. आपल्या मनातलं सरकार स्थापन झाल्यावर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढले. स्टे हटवला. सगळी कामं सुरु केली. म्हणून आपल्याला एवढच सांगेन मविआ सरकारच अडीच वर्षाच काम, आपल्या सरकारच दोन वर्षाच काम. होऊन जाऊ द्या जनतेच्या दरबारात दूध का दूध पानी का पानी” असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं.
“लाडक्या बहिण योजनेद्वारे १५०० रुपये, शेतकऱ्यांना मोफत वीज बिल, युवक प्रशिक्षण योजनेद्वारे तरुण-तरूणींना ६ ते ८ हजार रुपये. मोफत उच्च शिक्षण. बघतो, करतो, पाहतो, कमिटी वैगेरे नाही, डायरेक्ट डिबिटी. आज डिबिटीच्या माध्यमातून पैसे देतोय. हे सर्वसामान्यांच सरकार आहे’. असं देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.