ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत द्यावीच लागणार, अन्यथा आस्थापनांविरुद्ध होणार कारवाई

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे. 

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील. सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये