देशातील नेत्यांवर काजोलचे वादग्रस्त विधान; वाद वाढल्याने भूमिकेवरुन युटर्न
मुंबई | बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ काळ गाजवणारी काजोल सध्या नवीन चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसत आहे. अभिनेत्री काजोलनं एका कार्यक्रमात देशातील राजकारणावर केलेल्या विधानामुळं मोठं वादंग माजलं आहे. कमी शिकलेले लोक देश चालवत आहेत, अशा आशयाचं विधान तिनं केल्यानं मोठ्या ट्रोलिंगला तिला समोरं जावं लागलं आहे. वाद वाढत असल्याचं लक्षात येताच तिनं ट्विट करत आपल्या भूमिकेवरुन युटर्न घेतला. विशेष म्हणजे तिनं बोलताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही.
नेमकं काय म्हणाली काजोल?
‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत महिला सशक्तीकरण या विषयावर चर्चा करताना काजोल म्हणाली, “बदल हा विशेषत: भारतासारख्या देशात फार मंद गतीने होत आहे. हा बदल अत्यंत संथ गतीने होत आहे. कारण आपण आपल्या परंपरांमध्ये अडकलो आहोत आणि आपल्या विचारप्रक्रियेत अडकलो आहोत. अर्थातच या सर्व गोष्टींचा संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांना शैक्षणिक व्यवस्थेची पार्श्वभूमी नाही. मला माफ करा पण मी बाहेर जाऊन हेच सांगणार आहे. माझ्यावर नेत्यांचं राज्य आहे, त्यांच्यापैकी अनेकांचा तो दृष्टीकोन नाही. जो माझ्या मते शिक्षण तुम्हाला किमान वेगळा दृष्टीकोन शोधण्याची संधी देतो.”