लॉज ठरताहेत खुनाचे हॉटस्पॉट्स
खुनाला अनेक प्रकारची कारणे कारणीभूत
पुणे : एखाद्याचा निर्घृण खून करणे हे आता गुन्हेगारांसाठी आम बात झाली आहे. एखाद्याचा काटा काढायचा असेल तर ते ठिकाण महत्त्वाचे असते. रस्त्यात अडवून खून करणे किंवा चारचौघांच्या समोर खून करणे यापेक्षा चार भिंतींच्या आड खून करणे केव्हाही उत्तम हीच पॉलिसी सध्या काही गुन्हेगार अवलंबत आहेत. त्यासाठी एखाद्याचं घर, फार्म हाऊस अथवा लॉज अशा आरामदायी स्थळांना जास्त पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश लॉज खुनातील हॉट स्पॉट्स ठरत असल्याचे एकंदरीत झालेल्या प्रकारावरून अधोखित झाले आहे.
सुरक्षितता महत्त्वाची
अल्पवयीन प्रेयसीला लॉजवर बोलावून तिच्याशी वाद घातल्यानंतर प्रियकराने तिच्यावर ब्लेडने वार करून तिचा खून केल्याची घटना वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉज येथे घडली. मंगल (नाव बदलले आहे, वय १७, रा. आंबी, पुणे) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून, याप्रकरणी तिचा प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी (मु.रा. बीड) याच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. एकूणच लॉज सुरक्षितता महत्त्वाची आहे. लॉज मालकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
सध्या घडीला खून हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. अशा खुनातील प्रकारांना कारणेही अनेक असतात. साधारणतः त्यात किरकोळ कारण, वैयक्तिक कारण, आर्थिक कारण, पूर्ववैमनस्य याबरोबरच प्रेम प्रकरणातील महत्त्वाचे कारणसुद्धा असू शकेल. यातील अशाच एका आर्थिक कारणातून एका गुन्हेगाराने आपल्या विवाहित महिला प्रेयसीचा लॉजवर नेऊन काटा काढला आहे. मैत्री असलेल्या महिला प्रेयसीशी आर्थिक कारणावरून झालेल्या वादातून एकाने तिचा चाकूने वार करून तिचा खून केला. ही घटना सातारा रस्ता येथील शीतल लॉजवर घडली आहे.
खून करण्याचा नवीन फंडा तरुणांकडून केला जात आहे. हे आता बंद व्हायला पाहिजे. याकडे लॉज मालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संशयित ग्राहक वाटल्यास संबंधित मालकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. खास करून लॉजवर येणाऱ्या तरुण जोडप्याची शहानिशा करूनच प्रवेश द्यावा.
— जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ
शहरातील लॉज खुनासाठी वीक पॉईंट्स ठरत असल्याचे स्पष्ट होते. पुण्यात काही झालं तरीही गुन्ह्यांच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही. दिघी येथे एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केला. अशा खुनाच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असते. विवाहितेचा पती ४ वर्षांपासून एका खून प्रकरणी कारागृहात आहे. प्रकाश आणि विवाहितेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते अथर्व लॉजवर नेहमीच जात असत. थोडक्यात सांगायचं तर त्या माकर्याने प्रेयसीचा खून करण्यासाठी लॉजची निवड का केली असावी, हा प्रश्नसुद्धा विचार करायला भाग पाडतो.