राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

आवडतो पारंपरिक दसरा

भ्रामक समजुतींच्या नव्या प्रथांपेक्षा

शुभांगी गोखले, प्रसिद्ध अभिनेत्री

मला एखादी वृद्ध स्त्री आपल्या घरामध्ये घटाची पूजा करत असताना पाहणं अधिक आवडतं. तिने केलेली दसर्‍याची साधीशी पूजा मला अधिक आकर्षित करते. आपल्या संस्कृतीने नेहमीच साधेपणाचा गौरव केला आहे. तेच सूत्र आपण सांभाळायला हवं. तरच येणारा प्रत्येक दसरा अमाप सुख देऊन जाईल.

आम्ही घरात अगदी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करतो. घराला तोरण बांधणं, देवीची आराधना, आरती हे सगळे उपचार पार पाडल्यानंतर मी गाड्यांची पूजा करते. त्याचप्रमाणे घरातल्या शस्त्रांचीही पूजा होते. या वेळी मेकअप बॉक्सची पूजा आवर्जून करते, कारण तेच माझं शस्त्र आहे. अर्थात आता पूर्वीसारखी नवीन कपड्यांची खरेदी केली जात नाही. पूर्वी वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी केली जात असे. आता चित्र बदललं आहे.

दसरा हा वर्षातला एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण सण. पण पिढी बदलते तसे सणाचे संदर्भही बदलतात. मूळ गाभा तोच असला तरी साजरीकरणामध्ये बदल होत असतो. दसर्‍याबाबतही हा बदल मला जाणवतो. माझ्या वेळचा दसरा वेगळा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसत आहे. मला आठवतंय, दसर्‍याच्या दिवशी आम्ही सगळी मुलं खूप आनंद लुटायचो. सीमोल्लंघन करण्यासाठी वेशीबाहेर जायचो. सोनं म्हणजेच आपट्याची पानं लुटून आणत घरोघरी जाऊन थोरांच्या हाती ठेवायचो. नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. त्या निमित्ताने कॉलनीतले सगळे वडीलधारे एकत्र यायचे, भेटी घ्यायचे आणि अभीष्टचिंतन करुन घरी परतायचे. थोडक्यात, पूर्वी ‘सोशल होणं’ हा सणांमागील मुख्य विचार होता. सर्वांनी वेशीपलीकडे जाऊन येण्यामागेही हाच एकत्र येण्याचा संदेश होता. अगदी सगळ्या भागांमध्ये हे दृश्य बघायला मिळायचं. माझं लहानपण मराठवाड्यात गेलं. त्यामुळे तिथल्या चालीरिती बघतच मी लहानची मोठी झाले आहे.

आमच्या आजूबाजूला छोटी गावं आणि शेतीवाडी होती. दसर्‍याच्या सुमारास शेतकर्‍याच्या हातात पैसा खुळखुळत असल्याचं समजायचं. दिवाळीला नव्हे तर दसर्‍याला नवीन कपडे घेण्याची त्यांची लगबग जाणवायची. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मोलकरणींचीही सुटी असायची. घटस्थापनेपूर्वी त्या ‘दसरा काढलाय’ असं म्हणायच्या. आपण दिवाळीची साफसफाई करतो तशी दसर्‍याआधी साफसफाई करणं म्हणजे दसरा काढणं.

या काळात एकीकडे पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. त्या वेळी पावसाच्या सततच्या वर्षावानं आंबलेलं घर स्वच्छ करायचं, नीटनेटकं करायचं, गोधड्या-वाकळ्या धुवायच्या म्हणजे दसरा काढायचा. थोडक्यात, दसर्‍यापूर्वी कापडाचं असेल ते सगळं धुण्याची पद्धत होती. पूर्वी अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून सणाची चाहूल लागायची. काळ पुढे सरकला, तसं दसर्‍याचं हे पारंपरिक रूप बदलत गेलं. मुंबईत रहायला आल्यानंतर तर हे प्रकर्षानं जाणवलं. इथं रहायला आल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस आम्ही आरे कॉलनीतल्या एका देवीच्या देवळात दर्शनाला जायचो. पण आता तेदेखील होत नाही. गर्दीत मार्ग काढणं कठीण होत असल्यामुळे तिथं जाणं टाळलं जातं.

काळजीची बाब म्हणजे आता आपल्या सणांमध्ये पाश्‍चात्त्य सण इतके बेमालूमपणे मिसळले आहेत, की मूळ सणांतला जीव हरवल्याची खंत एका पिढीला वाटते. पण या बाबीकडे दुर्लक्ष केलं, तर आदिशक्तीच्या उपासनेचा, तिच्या पूजा-प्रार्थनेचा आणि रावणदहनाचा हा मुहूर्त आनंदवृद्धी करणारा असतो, यात शंका नाही.

खरोखर दसर्‍याच्या निमित्ताने आपल्या मनातला रावणही जळून जातो असं वाटतं. पावसामुळे मनंही आक्रसलेली असतात. त्यात मोकळा श्‍वास घेण्याचं, प्रकाशाला वाट मोकळी करून देण्याचं, निखळ उन्हाचं साम्राज्य पसरवण्याचं काम दसर्‍यापासून होतं. रावणदहनाला तर पौराणिक महत्त्व आहेच. खेरीज आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथाही पाळली जाते. पण सध्या आपट्याच्या नावाखाली दुसर्‍याच कुठल्या झाडाची पानं ओरबाडलेलीही बघायला मिळतात. ती मोठ्या प्रमाणात बाजारात आणली जातात. यामुळे वृक्षहानी होते, पण त्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही.

आपण हे सगळं लहान मुलांना, युवकांना सांगू शकत नाही कारण, त्यांची मनं आधीच वेगवेगळ्या विचारांमध्ये गुरफटलेली असतात. त्यापेक्षा मला एखादी वृद्ध स्त्री आपल्या घरामध्ये घटाची पूजा करत असताना पाहणं अधिक आवडतं. तिने केलेली दसर्‍याची साधीशी पूजा मला अधिक आकर्षित करते. आपल्या संस्कृतीने नेहमीच साधेपणाचा गौरव केला आहे. तेच सूत्र आपण सांभाळायला हवं. तरच येणारा प्रत्येक दसरा अमाप सुख देऊन जाईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये