फटाक्याच्या स्टाॅलवरून महाभारत

लिलाव प्रक्रियेचा फियास्कोच
पुणे : दिवाळी तशी भारतात अनादी काळापासून साजरी केली जात आहे. पण मग फटाके कधी याचा भाग झाले? पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केला तर लक्षात येते, की फटाक्यांचा उगम आपल्या संस्कृतीत झालाच नाही. प्राचीन ग्रंथांनुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. पण फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या कोणत्याही वस्तूचा उल्लेख नाही.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा चीनमध्ये होती. फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे वाईट विचारांना मूठमाती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल, अशी चिनी लोकांची श्रद्धा होती. पण भारतात आधी दिवाळी आणि कालांतराने विविध औचित्यपूर्ण प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी वाढली. यामध्ये विविध सण, राजकीय दौरे, वाढदिवस, ३१ डिसेंबर सेलिब्रेशन आणि अन्य काही आनंदी प्रसंगी फटाक्यांचा धुरळा वाढत गेला. फटाक्यांमुळे प्रदूषण वाढत गेल्याने त्यावर बंदी आणण्यात आली खरी, पण अजूनदेखील फटाक्यांच्या आतषबाजीची क्रेझ काही फारशी संपली नाही.
फटाक्यांचे स्टॉलधारक आणि ग्राहक यांच्यासाठी दिवाळी ही पर्वणीच असते. खरे तर जागोजागी फटाक्यांच्या स्टॉलला बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी हे स्टॉल उभारण्याचे आदेश देण्यात आले. पुणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या व्यवस्थापनाकडून दर वर्षी फटाके स्टॉल भाड्याने देण्यासाठी लिलाव लावला जातो. पण या लिलावादरम्यान दर वर्षी वाद झाले आणि रंगत गेले. कारण या लिलाव प्रक्रियेत जो जादा बोली लावेल, त्याला फटाका स्टॉल देण्यात येतात. कधी पोलिसांच्या परवानगीचा, तर कधी स्टॉलधारकांच्या असहकारामुळे महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेचा फियास्कोच उडत आहे.
तीन वर्षांपूर्वी महापालिकेने पोलीस परवानगीच्या अधीन राहून फटाके स्टॉलच्या जागेचे लिलाव जाहीर केले होते. परंतु, लिलावाच्या दिवशीच पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत स्टॉल उभारण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे महापालिकेला तोंडघशी पडावे लागले होते. २०२० वर्षी करोनामुळे फटाके स्टॉल लागलेच नाहीत. सन २०२१ मध्ये सहाही विभागांतील २३ ठिकाणी तब्बल ३११ फटाके स्टॉलची उभारणी केली गेली. यंदादेखील शनिवार पेठेतील वर्तकबाग येथील फटाका स्टॉलच्या जागा फटाका विक्रीसाठी भाड्याने देण्यासाठी पुणे महापालिकेत झालेल्या लिलावादरम्यान व्यावसायिकांमध्ये जोरदार शिवीगाळ, वादावादी झाली. लिलावाच्या प्रत्यक्ष ठिकाणी हा प्रकार घडला नसला, तरी महापालिका इमारतीतच वाद घडले.
यंदाही मालमत्ता विभागाकडून अर्ज मागविण्यात आले होते. ३५ फटाके स्टॉलसाठी ६६ जणांचे स्टॉलसाठी अर्ज मालमत्ता विभागाकडे आले होते. या लिलावातून पुणे महापालिकेला यंदा १४ लाख ६० हजार लिलावातून रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एका स्टॉलसाठी सर्वाधिक १ लाख १० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. या लिलावात काही जणांनी बोलीबाबतीत दादागिरी करून इतर व्यवसायिकांना बोली लावू न देण्याचा प्रयत्न केले. त्यामुळे महापालिकेतच फटाका व्यावसायिकांमध्ये जोरदार वादावादी झाली.
एकूणच दिवाळी सण हा आनंदाचा, प्रकाशाचा असतो. त्यामध्ये आपण अशा प्रकारचे वादविवाद शिवीगाळ याने सणाची सुरुवात झाल्यास नक्की ही फटाक्यांची आतषबाजी कशाला हा प्रमुख मुद्दा ऐरणीवर येतो. खरे तर फटाका स्टॉलवरून होणारे महाभारत होणे हे चुकीचे आहे. खरे तर फटाके उडवल्याने पैशांची उधळपट्टी होऊन त्या समवेत शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. फटाक्यांमुळे होणार्या जखमेच्या यातना आयुष्यभर भोगाव्या लागतात. ही स्थिती पाहता फटाक्यांवर बंदीच योग्य आहे.