“सगळ्यांचे लाड चाललेत लाड…”, अजित पवार गिरीश महाजनांवर संतापले

नागपूर | Ajit Pawar On Girish Mahajan – सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. तसंच आज (30 डिसेंबर) विधानसभा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभेत आज सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू असताना अजित पवार संतापले. चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर पुढे आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या पाच क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा होणं अपेक्षित होतं. तसंच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून या लक्षवेधीवर उत्तर येणं अपेक्षित होतं. मात्र, गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यावरून अजित पवार चांगलेच संतापले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “पाच नंबरची लक्षवेधी पुढे का ढकलली? वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलताय? आम्हीही मंत्री होतो. आम्ही काय इथे एकदम येऊन बसलो नाही. इथे यायचं मंत्र्याचं काम आहे. जर मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार?” असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
“एकवेळ आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. कारण त्यांना जास्तीची कामं असतात. दुसरे लोक उत्तरं देतात. हे आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन सभागृहात का आले नाहीत. सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात घेऊ. पुढच्या अधिवेशनात कोण राहतंय, कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? यावर तुम्हीही कुणी काही बोलत नाही. सगळ्यांचे लाड चाललेत लाड”, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला सुनावलं.