Kurla Bus Accident : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर (Kurla BEST Bus Accident) काल (९ डिसेंबर) रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी जाहीर केली. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने गर्दीच्या ठिकाणी घुसून पादचाऱ्यांना चिरडले आणि अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण गंभीर जखमी झालेत. या बसने १० वाहनांनाही धडक दिली. यामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. दरम्यान, बेस्ट बसचा चालक संजय मोरे (Sanjay More) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) बस (रूट ३३२) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडकली. तसेच ही हाऊसिंग सोसायटीच्या भिंतीवर आदळली. ही घटना रात्री ९:४५ च्या सुमारास घडली.