‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालनकाच्या भूमिकेत

मुंबई | असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत आता ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘महाराष्ट्राचा किचन क्वीन’ या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करणार असल्यामुळे या प्रोमोमध्ये संकर्षण झळकत आहे. यामध्ये संकर्षण महाराष्ट्रातून आलेल्या सुगरणींची ओळख करुन देत आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातून या सुगरणी आल्या असल्याचं संकर्षण या प्रोमोमध्ये सांगत आहे. तसेच या तिघी मिळून ज्वारीची भाकरी, शेवभाजी आणि खमंग शेंगदाण्याची चटणी बनवणार असल्याचं संकर्षण म्हणाला आहे. ‘कसा जमेल बेत, कशी असेल चव, खेळूया हा चवीचा खेळ नवीन, तिघींपैकी एक होणार महाराष्ट्राची किचन क्वीन’ असं संकर्षण या प्रोमोमध्ये म्हणाला आहे. ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ हा कार्यक्रम येत्या 15 मे पासून सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.