“बुवाबाबांच्या नादी लागू नका, रामदेव बाबांच्या नादाने माझे…” – अजित पवार; पाहा व्हिडीओ

कर्जत | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या (Rohit Pawar) मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बुवाबाजीच्या नांदाला लागू नका असा सल्ला अजितदादांनी उपस्थितांना दिला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता ते रामदेव बाबांनी सांगितलं म्हणून करता ना… अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नाही, असं म्हणत अजितदादांनी आपल्या डोक्यावर केसं नाही, असं दाखवण्यासाठी डोकच पुढे केलं होतं.
बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संतांचे ऐका, महापुरुषांचा ऐका. अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहु-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका. पण, बुवाबाबांचा काही ऐकू नका.
नखाला नखं घासू नका, काही तरी तिसरच व्हायचं, डॉक्टरकडे गेल्यावर ते सुद्धा म्हणतील तुम्हाला कुणी करायला सांगितलं, त्यामुळे बुवाबाबांचा ऐकू नका, असा सल्ला अजितदादांनी देताच मेळाव्यात एकच हश्शा पिकला.