पुण्यात काचेच्या पतंग मांजाने व्यावसायिकाचा गळा कापला
पुणे | जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्याचे सर्वांनाच वेड असते. यात प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. एकीकडे नायलॉन मांजा घातक असल्यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना दुसरीकडे मात्र आज ही नायलॉन मांज्याचीं सर्रास विक्री केली जात आहे.
संक्रातीनिमित्त पतंग उडविले जाते. पतंग उडवित असताना नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जातो. पुण्यात या नायलॉन मांजामुळं एका व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे असे या व्यावसायिकाचे नाव आहे. ही दुर्घटना वारजे येथील ढोणेवाड्याजवळ रविवारी घडली. जांभूळवाडी येथील निखिल लिपाणे यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. श्रीकांत यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.