गलथान राज्यकारभाराचे धिंडवडे…!
मणिपूर या छोट्या राज्याचा डंका असा वाजतोय हेच दुर्दैव!
मणिपूर… नाव जरी ऐकलं की, डोळ्यांसमोर संतापाची लाट येते. अनेक दिवसांपासून आरक्षणावरून हिंसाचाराच्या आगीत मणिपूर जळत आहे. जिवंत शरीराने, उघड्या डोळ्यांनी अख्खे जग हे पाहतोय. इथेच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढत सामूहिक अत्याचाराची हादरवणारी घटना घडते. हा घृणास्पद प्रकार आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीराशी खेळणारे हे लोक निर्दयीपणे आनंद घेत आहेत. ही घटना लज्जास्पद आहे. घटनेचा निषेध पुरेसा नसून प्रशासनाने ठोस कृती करण्याची गरज आहे.
मणिपूर (Manipur) राज्यात दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 4 मे रोजी घडली. मैतेई समुदायातील शेकडो लोक कांगकोपकी जिल्ह्यातील केबी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांच्या हातामध्ये हत्यारे होती. त्यांनी गावात शिरताच जाळपोळ सुरू केली. त्यामुळे तेथील गावातील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. कोणी जंगलाच्या दिशेने पळाले. त्यापैकी तीन महिलाही जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळाल्या. त्यापैकी दोन महिलांना झुंडीतील विकृत लोकांनी, नराधमांनी घेरले. त्या नराधमांनी या महिलांची नग्न धिंड काढली. त्यानंतर शेतात नेऊन सामूहिक अत्याचार केला. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेले व्हिडीओ संताप आणणारे आहेत.
ही घटना 4 मे रोजी घडली. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर म्हणजे व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर ही घटना सर्वांच्या निदर्शनास आली. धक्कादायक बाब हीच की, ज्यावेळी असे कृत्य होत होते अथवा ज्या परिसरात ही घटना घडली त्यावेळी तेथील प्रशासन, पोलीस झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. समाजाचा आरसा समजली जाणारी तेथील पत्रकारिता त्यावेळी कुठे होती, हाही प्रश्न उपस्थित करणारा आहे. बदलत्या काळाप्रमाणे महिलांचे हक्क, महिलांना समान संधी, समान सामाजिक दर्जा आदी संकल्पना निर्माण होऊन महिलांच्या सक्षमीकरणाचे युग अवतरले आहे. तरीसुद्धा स्त्री जातीचा दैवदुर्विलास संपलेला नाही. तो संपण्याची अंधुकशीदेखील शक्यता येत्या भविष्यकाळात नाही.
जगातल्या माणसांच्या एकूण संख्येपैकी साधारण 50 टक्के असलेल्या महिलांना पुरुषी अहंकाराचे बळी का व्हावे लागते, हा प्रश्न आजकाल पडणे हेच मुळी लांच्छनास्पद आहे. अशा प्रकारांना व महिलांच्या या अवस्थेला जबाबदार कोण? सध्याचा काळ, बदलती सामाजिक मूल्ये, प्रचलित कायद्याची अंमलबजावणी, बेबंद चंगळवाद की मानसिक विकृती? यापैकी कुठल्याही एका कारणाचा स्वतंत्र विचार करून चालणार नाही. एकूणच हा प्रकार माणसाच्या विवेकाची इतकी हीन पातळी दाखवतो की, अशा प्रकारांना चाप बसवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता वाटते.
आता तर जाती-धर्मात वादाचा मुद्दा उपस्थित होत आहे. तो इतका टोकाला जात आहे की, राज्यकारभाराची, प्रशासनाची, पोलिसांची भीती न बाळगता दिवसाढवळ्या अनेक विकृत कृत्यं करायला विकृत लोक मागेपुढे पाहात नाहीत. तशीच परिस्थिती मणिपूर राज्यात दिसून येते. राज्य छोटे असो किंवा मोठे राज्यकारभाऱ्यांचा त्या ठिकाणी वचक असला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची, घटनेची कायद्याची जाणीव राज्यकारभाऱ्यांना असायलाच हवी. विकृत लोकांनी तर कायद्याची चौकटच ओलांडली आहे. याला चाप लावला पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांसहित राज्यकारभार चालवणाऱ्या लोकांनी प्रशासनावर पकड ठेवली पाहिजे. या किळसवाण्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयानेही राज्य अन् केंद्राला चांगलेच धारेवर धरले. तुम्ही लवकर कारवाई करा, नाहीतर आम्ही कारवाई करू. असे म्हणत न्यायालयानेही संताप व्यक्त केला. मग आपल्या पंतप्रधानांनी आरोपींना सोडणार नाही, कठोर शिक्षा करणार असल्याचे सांगितले.
राहिला मुद्दा, मणिपूर सरकारचा. मागील अनेक महिने झाले, आरक्षणावरून उफाळलेला हिंसाचार रोखण्यात मणिपूर सरकार फेल झाले हे नक्कीच आहे. हिंसाचार रोखण्यासाठी राज्यात लष्कर व आसाम रायफल्सच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या असूनदेखील मणिपूर अशांतच असल्याचे चित्र आहे. अशात महिलांवरील शारीरिक हल्ले होत आहेत. ‘मणिपूरमध्ये खालावत जाणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खरंच चिंताजनक आहे. राज्याचा गाडा हाकता आला नाही तर मणिपूरच्या राज्यप्रमुखाने (मुख्यमंत्री) राजीनामा देणे खरंच चांगले. नाही तर केंद्राने त्यांचा राजीनामा घ्यावा. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली, तेथील पोलीस प्रशासनाने त्यावेळी गंभीर दखल घेतली नाही. हे कृत्य रोखण्यासाठी प्रशासन कमी पडले.
या सर्वांवर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे. महिलांना अपमानित केलेल्या झुंडीतील सर्व नराधमांवर त्वरित अन् कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे, तरच लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढेल. जगात भारताचा गाजावाजा आहे हे खरंच. जग तुम्हाला नावाजतंय, कोणी बाॅस म्हणतंय, कोणी जबरदस्त प्रसिद्धी देतंय, जगात भारताचा डंका तुमच्यामुळे वाजतोय हेही तितकेच खरे. जगात डंका वाजतोय, ठीक आहे, पण आपल्याच देशातील एका छोट्या राज्याचा डंका याप्रकारे वाजावा हेच आपले दुर्दैव!