अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

मराठी पाऊल पडते पुढे!

दिलीप फलटणकर

एकविसावे शतक हे भारतासाठी कॉर्पोरेट क्रांतीची पहाट घेऊनच आले आहे. माहिती तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही काही हजारांत पगार घेतले, आता लाखांचे पॅकेजेस मिळू लागले. अगदी पासपोर्टचा विचार न करणारी आमची पिढी, परदेशी वार्‍या करू लागलीय. लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही हे कॉर्पोरेट जगाचे भाग झाले आहेत. एका बाजूला प्रचंड समृद्धी होत असताना बेकारी भयानक रूप धारण करीत आहे. महागाई, समाजातील आर्थिक विषमता वाढत आहे.

मराठी भाषा म्हणजे संस्कृती नसली तरी संस्कृतीचा, माणसाच्या जगण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. भाषा हे संवादाचे, ज्ञाननिर्मितीचे महत्त्वाचे साधन आहे. या तंत्रयुगात आपण भाषा वापरण्यापेक्षा आता आपण डिजिटल चित्र वापरू लागलो. त्याला इमोजी म्हणतात. आपण कितीही नावे ठेवली तरी याचा वापर करणार्‍यांची संख्या वाढते आहे. तंत्रज्ञानाने भाषेत जे बदल केले ते स्वीकारून पुढे जावे लागेल, तरच आपण काळाबरोबर राहू, हे लक्षात घ्यायला हवे.


माझा हा लेख तुम्ही आम्ही पालक’ या दर्जेदार आणि सांस्कृतिक समृद्धी वाढावी, यासाठी सातत्याने समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन एका ध्येयाने वाटचाल करणार्‍या मासिकात प्रकाशित होईल, तोपर्यंत उदगीर येथील ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले असेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर या आयोजक संस्थेने सर्वसमावेशक असा विचार करून चांगले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केले, असेच म्हणावे लागेल. अनेक भाषा, विविध संस्कृती हे आपल्या देशाचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांत आणि परदेशांतही मराठी भाषा जपण्याचा, समृद्ध करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.

इंग्रजीचे आक्रमण आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जागतिकीकरण अशा झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती याबाबत चिंता वाटणे साहजिक आहे. एकविसावे शतक हे भारतासाठी कॉर्पोरेट क्रांतीची पहाट घेऊनच आले आहे. माहिती तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही काही हजारांत पगार घेतले, आता लाखांचे पॅकेजेस मिळू लागले. अगदी पासपोर्टचा विचार न करणारी आमची पिढी, परदेशी वार्‍या करू लागली. लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही हे कॉर्पोरेट जगाचे भाग झाले आहेत. एका बाजूला प्रचंड समृद्धी होत असताना बेकारी भयानक रूप धारण करीत आहे. महागाई, समाजातील आर्थिक विषमता, ग्रामीण व शहरी भागातील शिक्षण, इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा, मराठी शाळा बंद पडणे, निसर्गाचा बदलता समतोल, त्यामुळे बदलणारे निसर्गचक्र, त्याचा शेतीव्यवसायावर होणारा परिणाम या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर, समाजावर आणि राष्ट्रावर परिणाम होणे अपरिहार्य आहे. खूप वेगाने बदलणार्‍या परिस्थितीचा परिणाम भाषेवर आणि संस्कृतीवर होत असतो. या वास्तवाची जेवढी लवकर दखल घेऊ तेवढे आपण त्या वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी करण्यासाठी सक्षम होण्याची शक्यता असते. भाषेबरोबर संस्कृतीचे आणि त्या समाजाचेही नुकसान होत असते, हे विसरता कामा नये. भाषेबद्दलचे भान अलीकडच्या काळात कमी होत आहे असे दिसते, हे मला जास्त चिंताजनक वाटते. भारतात अनेक भाषा आहेत, तशाच बोलीही आहेत. अनेक बोलीभाषांना स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळाला. काही भाषांना साहित्य अकादमी’ने साहित्यनिर्मिती करणारी भाषा, असा दर्जा दिला.

मराठी भाषेचे भवितव्य
आपली मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषा जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. देशातील ३६ राज्यांत आणि ७२ देशांत मराठी माणसे राहतात. जी भाषा पंधरा कोटी लोक बोलतात, त्या भाषेतील वर्तमानपत्रे, मासिके, दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. ती भाषा समृद्ध होणार, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. पण ती शुद्ध स्वरूपात कशी जतन करायला हवी, तिचे सांस्कृतिक वैभव जपण्याचा प्रयत्न करणे ही गरज आहे.
सुरेश भट म्हणतात ते लक्षात ठेवावे लागेल, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या घराघरांत राहते मराठी. माणसांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा, जोडून ठेवणारा धागा कोणता असेल, तर ती आमची भाषा – मायमराठी.


माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज निर्माण होत असताना काही प्रश्न नव्याने निर्माण होत असतात. उद्याचा भारत’ शाळेच्या चार भिंतींत घडत असतो. जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, मुलांना चांगले आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण यांवरच त्या देशाचा विकास अवलंबून आहे. भारतीय तरुणांची संख्या हे भारताचे बलस्थान आहे. आज मराठी शाळा बंद पडत आहेत आणि अगदी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहेत; पण आईच्या नंतर जर कोण आपल्यावर संस्कार करत असेल, आपले व्यक्तिमत्त्व घडवत असेल तर मातृभाषा. इंग्रजी माध्यमातून मुलाने शिक्षण घेतले तर त्याला अनेक संधी उपलब्ध होतील, असे आज प्रत्येकाला वाटते. पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतले तर तो नैसर्गिक व परिसरातील सामाजिक वातावरणात राहतो. त्यामुळे भाषा आणि त्यातील संकल्पना लवकर समजतात. मुलगा भाषा कशी शिकतो, तर प्रथम भाषा मुलाच्या कानावर पडते. तोंडाने भाषा बोलतो; मग वाचणे आणि लिहिणे या गोष्टी घडतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये