भारत चितपट..! कुस्ती क्षेत्राला मोठा हादरा; कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द

नवी दिल्ली | Wrestling Federation India – गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठरलेल्या वेळेत निवडणुका पार न पाडल्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यपद रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. रेसलिंग बॉडीने कुस्ती महासंघाला काही दिवसांपूर्वीच निवडणूक पार पाडण्यासाठी सूचना केली होती. परंतु तरीदेखील निवडणूक न झाल्याने कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं हा भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघ सतत वादाच्या भोवऱ्यात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाला निवडणूक घेण्यासाठीची नोटीस जारी केली होती. निवडणुका झाल्या नाही तर महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असंही युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आले होते. परंतु त्याकडे क्रीडा मंत्रालयाने साफ दुर्लक्ष केल्यामुळं कुस्ती महासंघाचं सदस्यत्व गेल्याचं बोललं जात आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर नवख्या महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्याची कारवाई केली. त्यानंतर कोर्टाने कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १२ ऑगस्ट ही निवडणुकीसाठीची नवी तारीख जाहीर करण्यात आली. परंतु त्यावेळी हरयाणा कुस्ती महासंघाने निवडणुकांवर स्थगिती आणण्यासाठीची याचिका चंदीगड हायकोर्टात दाखल केली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणारी निवडणूक स्थगित झाली. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा अर्ज दाखल केला होता. परंतु वारंवार निवडणुका स्थगित होत असल्यामुळे जागतिक वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला.