जीएंची स्मृतिचित्रे

जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दी विशेष
अभिराम भडकमकर, सुप्रसिद्ध साहित्यिक
जीएंचं लेखन निराशावादी असल्याची टीका वारंवार ऐकायला मिळते, परंतु मला कधीच ते निराशावादी वाटत नाही. त्यांनी कधीही निराशेनं लिहिलं नाही. यातली एक बाब अशी की, विश्वाच्या या पसार्यामध्ये माणूस अणू-रेणूइतका तोकडा आहे. यामुळे येणार्या मानवी मर्यादांवर जीएंनी कायम प्रभावी भाष्य केलं.
लेखकाने सामाजिक चळवळीमध्ये उतरावं, राजकीय भाष्य करावं अशी वाचकांची अपेक्षा असते. मात्र या सगळ्यापलीकडे जाऊन जीएंनी अत्यंत निष्ठापूर्वक केवळ साहित्य आणि साहित्यातच काम केलं. आज मागे वळून बघताना लक्षात येतं की, त्यांच्या साहित्यकृतींनी समाजाला उन्नत केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं भान देऊ केलं आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या सर्वांचा धांडोळा घ्यायलाच हवा.
वाचकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे लेखक जी. ए. कुलकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना त्यांच्या विलक्षण कामाचा, कसदार लेखनाचा आढावा घ्यायलाच हवा. मराठीतले अत्यंत दमदार लेखक अशी जी. ए. कुलकर्णी यांची ओळख आजही टिकून आहे. पूर्णपणे लेखनाला वाहून घेणारा तो एक हाडाचा लेखक होता. वेगवेगळे फॉर्म न हाताळता त्यांनी केवळ ‘दीर्घकथा’ या लेखनप्रकारातच लेखन केलं. त्यांच्या लेखनाकडे पाहताना जाणवणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लेखन कोणत्याही काळापुरतं मर्यादित नाही. आपल्याकडे ‘समकालीन वास्तव’ हा एक शब्द वारंवार वापरला जातो.
पण या प्रकारातलं लेखन कायमच ठरावीक कालावधीपुरतं मर्यादित राहणारं असतं. सध्या समाजामध्ये असणारे प्रश्न, सद्यस्थितीत असणारं वातावरण याविषयी लिहिण्याला सध्या उगाचच एक वेगळी प्रतिष्ठा आली आहे आणि असं लेखन म्हणजेच साहित्य, ही एक धारणा बघायला मिळत आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जात जी. ए. कुलकर्णी हे मानवाच्या मूलभूत वृत्ती आणि प्रवृत्ती यांचा शोध घेणारे लेखक होते हे सर्वप्रथम आपण समजून घ्यायला हवं. म्हणूनच त्यांचं लेखन कोणत्याही एका काळापर्यंत मर्यादित करून ठेवता येत नाही. त्यांनी मनाचेे विविध कंगोरे, स्वभाव, चिरंतन असणारे षड्विकार हे सगळं लक्षात घेऊन मानवी भावभावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लेखनाला गूढतेचा स्पर्श होता. ती गूढता होती, कारण त्यांच्या मते, माणसांचं आयुष्य हेच एक गूढ आहे. त्याला आयुष्यभरात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. माणूस पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं या चिरंतन प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतो आहे. आपल्या सर्व कथांमधून जीएंनीही अशाच चिरंतन प्रश्नांचा शोध घेतलेला दिसतो. त्यामुळेच त्यांच्या लेखनामध्ये कायमच ही गूढता आली. मनुष्यजीवनाचा अनिवार्य भाग असल्यामुळे ती कायम डोकावत राहिली.
जीएंचं लेखन निराशावादी असल्याची टीका वारंवार ऐकायला मिळते. परंतु मला कधीच ते निराशावादी वाटत नाही. त्यांनी कधीही निराशेनं लिहिलं नाही. यातली एक बाब अशी की, विश्वाच्या या पसार्यामध्ये माणूस अणु-रेणूइतका तोकडा आहे. यामुळे येणार्या मानवी मर्यादांवर जीएंनी कायम प्रभावी भाष्य केलं. हा तोकडेपणा जाणवल्यामुळेच त्यांच्या लेखनात कुठे तरी नियतीशरणता दिसते. पण असं असलं तरी त्यांच्या ‘घर’, ‘ऑर्फियस’ या कथांमध्ये निराशा नाही, तर आयुष्याकडे बघण्याची अत्यंत स्पष्ट दृष्टीही आहे. माणसाला मृत्यूचं रहस्य उलगडलं तर काय? हा विचार करून असं झालं तर त्याच्या आयुष्यातलं औत्सुक्य, असोशी निघून जाईल; त्याच्या आयुष्यात काही प्रश्नच उरणार नाहीत हा विचार ते या कथांमधून मांडतात. काही प्रश्नच उरले नाहीत तर अशा माणसाचं काय होईल, अशा स्वरूपाची मांडणी ते या कथांमधून करतात.
त्यांची ‘यात्रिक’सारखी कथा तर विलक्षण प्रभावी आहे. या कथेने माझ्या जीवनावर आणि विचारपद्धतीवर खूप मोठा परिणाम केला. अंतिम असं काहीही नसतं, असं ते या कथेतून सांगतात. शोध हा अत्यंत महत्त्वाचा असतो, असं ते याद्वारे सांगतात. या कथेतलं एक पात्र म्हणतं की, मला साक्षात्कार झाला आणि एक रहस्य उलघडलं. त्यावर दुसरं पात्र म्हणतं, म्हणजे त्या दिवशी नेमकं काय झालं. तर पहिलं पात्र म्हणतं, त्या दिवशी वीज चमकली… मग त्यावर दुसरं पात्र विचारतं की, परत असं होण्याची शक्यताच नाही का? म्हणजेच प्रश्नांची आपल्याला सापडलेली उत्तरं ही अंतिम आहेत असं सांगता येत नाही. जीए ही बाब पुन्हा पुन्हा सांगतात. ‘यात्रिक’ या कथेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांचं साहित्य आपल्यालाही जगण्याकडे वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या विचारांनिशी पाहण्यास भाग पाडतं. त्यांचं साहित्य वाचल्यानंतर सगळ्या चौकटी तोडून आपण रूढ जीवनाकडे पाहू लागतो. हेच जीएंच्या साहित्याचं खरं महत्त्व आणि मर्म आहे असं म्हणता येईल.
ते कधीही तात्कालिक गोष्टींमध्ये रमले नाहीत. त्यांनी कधीच तात्कालिक बाबींवर लिहिलं नाही, कारण त्यांना मानवी जीवनासंदर्भातले चिरंतन प्रश्नच भेडसावत होते. तेच त्यांना मोहात पाडत होते. म्हणूनच त्यांनी अशा प्रश्नांवर लक्ष पूर्णपणे केंद्रित केलं. आज मागे वळून बघताना लक्षात घेतं की, केवळ त्यांच्या साहित्यकृतींनीही समाजाला उन्नत केलं आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं भान देऊ केलं आहे. एक साहित्यिक लेखणीच्या माध्यमातून समाजाला किती आणि काय काय देऊ शकतो, याचं मोठं उदाहरण म्हणजे जी. ए. कुलकर्णी!
(शब्दांकन : स्वाती पेशवे)