पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आली दमदार खाती

पुणे – राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्य मंत्री मंडळाचे खातेवाटप आज (ता. २१) रात्री जाहीर झाले. यामध्ये पुणे (Pune) जिल्ह्याच्या वाट्याला दमदार खाती आलेली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व नियोजन खाते आले असून, त्याचा फायदा जिल्ह्यातील २१ आमदारांना होऊ शकतो. तर भाजपने नगरविकास राज्यमंत्रिपद पुण्याकडे दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारमधील मंत्रिमंडळात पुण्यातील चार आमदारांचा समावेश आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रेय भरणे आणि माधुरी मिसाळ (Madhuri Misal) हे मंत्रिमंडळात आहेत. खाते वाटपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभाग देण्यात आला आहे. तर पूर्वीच्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागचे राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) घेण्यात पवारांना यश आले आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग (Ministry of Higher and Technical Education) आणि संसदीय कामकाज हे दोन्ही विभाग पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यांच्याकडील वस्त्रोद्योग विभागाचा भाग कमी करण्यात आला आहे. दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.