म्हैसूर पॅलेसजवळ मोदी योगाभ्यासात सहभागी
बंगळुरू : भारतासह जगभरात आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योगदिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मैदानावर पोहोचले होते. त्यांनी जवळपास १५००० लोकांसोबत योगा केला. मोदींनी ताडासन, त्रिकोणासन, भद्रासन या आसनांनी योगास सुरुवात केली. यावेळी मोदी म्हणाले की, योग हा आता जागतिक पर्व बनले आहे. तो जीवनाचा भाग नसून जीवनाचा एक मार्ग बनला आहे. आज योग मानवजातीला निरोगी जीवनाचा आत्मविश्वास देत आहे. आज सकाळपासून आपण पाहत आहोत, की काही वर्षांपूर्वी आध्यात्मिक केंद्रांमध्ये दिसणारी योगाची चित्रे आता जगाच्या कानाकोपर्यात दिसू लागली आहेत.
ही सामान्य मानवतेची चित्रे आहेत. हा एक जागतिक उत्सव बनला आहे. हे केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे यावेळची थीम योग फॉर ह्युमॅनिटी अशी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. ‘योगाला जगासमोर नेण्यासाठी मी संयुक्तराष्ट्रांचे आभार मानतो. मित्रांनो, आपल्या ऋषीमुनींनी, सांगितले आहे की, योगामुळे आपल्याला शांती मिळते. याने आपल्या देशात आणि जगात शांतता नांदते. हे सर्व जग आपल्या शरीरात आहे. हे सर्वकाही सजीव करते. योग आपल्याला सतर्क, स्पर्धात्मक बनवतो. योग लोक आणि देशांना जोडते. हे आपल्या सर्वांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते.’ मोदी म्हणाले, ‘देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे.
अशा परिस्थितीत देशातील ७५ ऐतिहासिक केंद्रांवर एकाच वेळी योगासने केली जात आहेत. हे भारताच्या भूतकाळाला भारताच्या विविधतेशी जोडण्यासारखे आहे. जगातील विविध देशांमध्ये लोक सूर्योदयासह योगासने करत आहेत. सूर्य जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे विविध देशांतील लोक त्याच्या पहिल्या किरणाने एकत्र येत आहेत. हे गार्डियन रिंग ऑफ योगा आहे.’ ‘मित्रांनो, जगातील लोकांसाठी योग हा केवळ ‘जीवनाचा भाग’ नसून आता ‘वे ऑफ लाइफ’ बनत आहे. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, योगसाधक दिवसभरात वेगवेगळ्या वेळी प्राणायाम करतात, मग पुन्हा कामाला लागतात हे आपण पाहिले आहे. आपण कितीही तणावात असलो तरी काही मिनिटांच्या योगामुळे आपली सकारात्मकता आणि उत्पादकता वाढते. आपल्यालाही योग साधायचा आहे.’