मोदींनी एलपीजी गॅसची किंमत भारतात सर्वात जास्त करुन वेगळाच विक्रम स्थापित केला – नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. विश्वगुरुची उपाधी घेऊन मिरवणारे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने भारत जगात एका बाबतीत पहिल्या नंबरवर गेला आहे. महासत्तेचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी एलपीजी गॅसची किंमत जगात सर्वात जास्त भारतात करून एका वेगळाच विक्रम स्थापित केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा निशाणा साधत नाना पटोले म्हणाले, देशात सध्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागतात तर व्यवसायासाठी लागणाऱ्या सिलिंडरसाठी तब्बल २२५० रुपये मोजावे लागतात. भारतात पेट्रोलची किंमत जगाच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर आहे तर डिझेल ८ व्या नंबरवर आहे. दरडोई उत्पन्नाची तुलना करता भारतातील नागरिकाला त्याच्या उत्पन्नातील २८ टक्के रक्कम इंधनावर खर्च करावी लागते. पेट्रोल डिझेल, गॅसच्या किमती प्रचंड वाढल्याने त्याचा भार सामान्य जनतेच्या बजेटवर पडत आहे.
विकसित देशाची तुलना करता भारतीय नागरिकाला इंधनाच्या खर्चापोटी जास्त खर्च करावा लागतो. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेला इंधन महागाईचे हे चटके बसत आहेत. ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत भारताला महासत्ता बनवण्याचे दिवसा स्वप्न दाखवले. पण ना तर अच्छे दिन आले ना भारत महासत्ता बनला. महागाईच्या बाबतीत मात्र देशाला आघाडीवर नेऊन ठेवले आहे. आज पुन्हा एकदा सीएनजी ५ रुपये तर व पीएनजी ४.५० रुपयांनी वाढवले आहेत. असं पटोले म्हणाले.
डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार असताना हाच एलपीजी गॅस ४१० रुपयांना येत होता तर पेट्रोल ७२ रुपये लिटर होते. महागाईची झळ सामान्य जनतेला बसू नये यासाठी युपीए सरकार नेहमी तत्पर असे पण मोदी सरकारच्या काळात मात्र जनतेपेक्षा उद्योगपती मित्रांच्या हिताची जास्त काळजी केली जाते, असंही पटोले म्हणाले.
पुढे नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती सातत्याने कमी झाल्या. या किमती १८ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आल्या होत्या. क्रूड ऑईलचा आठ वर्षातील सरासरी दर काढला तर तो ६० डॉलर प्रती बॅरल एवढा आहे. परंतु मोदी सरकारने इंधनावर कर वाढवून लुट केली.