मातृत्व म्हणजे स्त्रियांना देवाकडून मिळालेले वरदानच
नुकताच मातृदिन झाला. मातृदिनाच्या सर्व मातांना खूप खूप शुभेच्छा!! बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म!! असे आपण नेहमी ऐकतो ते अगदी खरे आहे. बाळाला ९ महिने पोटात वाढवल्यावर आणि प्रसूतीच्या अगणित कळा सोसल्या, की बाळ जन्माला येते. जशी एक माता बाळ नऊ महिने पोटात असताना काळजी घेते, तसेच प्रसूतीनंतर मातेने स्वत:ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
बाळ जन्माला आल्यानंतर अनेक माता बाळाची काळजी घेण्यात खूप गर्क होतात व स्वतःकडे दुर्लक्ष केले जाते आणि मग मोठमोठे आजार वर डोके काढतात. त्याबद्दल मी थोडेसे सांगणार आहे. बाळाच्या जन्मानंतर १ वर्ष बाळासोबत आईची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. प्रसूतीचा थकवा गेलेला नसतो, बाळाच्या झोपायची वेळ निश्चित नसते, त्यामुळे आईची झोप होत नाही. सीझर झाल्यावर टाके दुखतात. प्रसूतीनंतर होणार्या आजारांमध्ये मुख्यत्वे निद्रानाश, पित्त होणे, मूळव्याधीचा त्रास होणे, सायटिका, पाठदुखी आणि सांधेदुखी व अनेक स्त्रियांना हार्मोनल प्रॉब्लेम्स होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसूतीनंतर येणारे नैराश्य. सध्या याचे प्रमाण फार वाढलेले आहे. पोषक आहार अपुरा घेतला व घेतला नाही की त्यातील सर्व घटक बाळाला जातात आणि आईला त्यातील पोषक घटक मिळत नाहीत आणि त्यामुळे व्हिटॅमिन डेफिशियन्सी, अशक्तपणा, चक्कर येणे अशा अनेक आजारांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते. हे आजार आपण सहजपणे घरगुती छोटे-छोटे उपाय करून टाळू शकतो.
सर्वात महत्त्वाचे अनेक आजार होतात, कारण बाळाच्या झोपायची वेळ सुरुवातीला काही महिने तरी ठरलेली नसते, त्यामुळे आईची झोप अपुरी राहते. सर्वात चांगला उपाय म्हणजे बाळ झोपले, की आपणपण झोपून घेणे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शरीरातले सर्व पोषक घटक बाळाला जातात, म्हणून तिने स्वतःचा आहार व्यवस्थित ठेवणे आणि जोपर्यंत स्तनपान करीत आहे तोपर्यंत व्हिटॅमिन्स आणि लोहयुक्त गोळ्या घेणे खूप गरजेचे असते. त्यानंतर छोटासासुद्धा कुठलाही त्रास जाणवल्यास योग्य वेळी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घेणे. प्रसूतीनंतर येणारे नैराश्य स्त्रियांच्या जीवनात खूप बदल घडवतात.
मनात येणारे विचार व्यक्त करणे खूप गरजेचे असते, मावशी, आई, नवरा कोणाहीसमोर मनात येणारे विचार व्यक्त करायला शिका. दिवसातला थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा. बाळंतपणानंतर काही महिने तरी आपल्याला खाण्याचे आणि राहण्याचे काही नियम पाळावे लागतात, हे पहिले स्वीकारा. मातृत्व हे खूप सुंदर देवाने सगळ्या स्त्रियांना दिलेले वरदान आहे. त्यामुळे ही गोष्ट कठीण न करता सहज, सोप्या रीतीने हाताळा. प्रसूतीनंतर होणार्या सर्व आजारांवर होमिओपॅथी औषधांची मात्रा रामबाण ठरू शकते.
_डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, (एमडी) होमिओपॅथी मेडिसीन्स
drishwari.joshi@gmail.com