ऋतूजा लटके राजीनामा प्रकरणात मुंबई हायकोर्टाने BMC ला अत्यंत कडक शब्दांत फटकारलं!
मुंबई : (Mumbai High Court On BMC Rutuja Latke Matter) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतूजा लटके यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र लटके यांना देण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.
पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्यामागील कारणं सांगितली होती. राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे,’ असा युक्तिवाद पालिकेचे वकील साखरे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी अंतरिम आदेश देताना मुंबई हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दांत पालिकेला फटकारलं आहे.
‘महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार असला तरी तो योग्य व वाजवी पद्धतीने वापरायचा असतो. अन्यथा तेही न्यायिक तपासणीच्या अधीन येते. या प्रकरणात कुहेतू मनात ठेवून आणि मनमानी पद्धतीने राजीनामा पत्र स्वीकारण्यात दिरंगाई केली असल्याचे दिसत आहे,’ असं गंभीर निरीक्षण न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने नोंदवलं आहे.