मुंबई महापालिकेचे तब्बल ६,५८३ कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेची तब्बल सहा हजार कोटी रुपयांची थकबाकी अद्याप भरलेली नाही. आणि त्यावर राज्य सरकारनं मौन देखील बाळगलं आहे. मिड डे या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केलं असून, एका सामाजिक कार्यकर्त्याने हा दावा केला आहे.
केंद्राकडून प्रलंबित जीएसटी परतावा मिळालेला नाही, अशी तक्रार वारंवार राज्य सरकार करत असतं. मात्र राज्य सरकारनेच मुंबई महापालिकेची ६,५८३.७१ कोटी रुपये अनुदान आणि कर दिला नाही. “बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) राज्य सरकारकडून 6,583.71 कोटी रुपये अनुदान आणि कर मिळालेला नाही. बहुतांश प्रलंबित रक्कम राज्याच्या गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, गृह, शिक्षण, महसूल आणि वन, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागांशी संबंधित आहेत.” असं भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी असं म्हटलं आहे. अशी माहिती एका अहवालानुसार मिळाली आहे.
राज्याच्या अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना थकीत रकमेबाबत बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्र लिहिलं आहे. उपसचिवांनी या पत्राला ऑक्टोबर 2021 मध्ये उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, “थकबाकीची रक्कम मिळवण्यासाठी बीएमसीने संबंधित विभागाला कळवणं आवश्यक आहे.”
बीएमसीची ६,५८३.७१ कोटी रुपये एवढी राज्य सरकारकडे थकबाकी आहे. कॅगच्या अहवालानुसार, ५,५८६.२२ कोटी रुपये अनुदान, ९८९.८९ कोटी रुपये मालमत्ता आणि पाणी कर आणि जुलै २०२१ पर्यंत बीएमसीने राज्यासाठी गोळा केलेल्या विविध उपकरांवर ७.६ कोटी रुपयांची सूट असे एकूण ६,५८३.७१ कोटी रुपये सरकारने थकवले आहेत.