शाहरुख खान धमकी प्रकरण; छत्तीसगडमधून वकिलास अटक
बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan death threats case) याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छत्तीसगडमधील वकील फैजान खान (Faizan Khan) याला अटक केली आहे. गेल्या आठवड्यात वांद्रे पोलिस स्थानकात लँडलाइन फोनवर शाहरुख खानला धमकी आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक छत्तीसगडमध्ये गेले होते. यादरम्यान ही कारवाई केली.
ज्याच्या मोबाईलवरून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती; त्या फैजान खानला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वकिलाने दावा केला की त्याचा मोबाईल चोरीला गेला होता आणि त्याचा वापर धमकी देण्यासाठी केला.
संशयिताला मुंबईत आणणार
पुढील तपासासाठी संशयित आरोपीला मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी शाहरुखला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फैजानवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. वांद्रे पोलिसांनी कलम ३०८ (४) (खंडणीसाठी जीव मारण्याची अथवा गंभीर दुखापतीची धमकी) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या ३५१(३)(४) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रायपूरमधून आला होता कॉल
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात धमकीचा फोन आला होता. पोलीस हवालदार संतोष घोडके (३२) यांनी हा कॉल उचलला होता.५० लाखांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास शाहरुख खानला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी फोनवरुन मिळाली. धमकीचा फोन करणाऱ्याने सांगितले की, मी शाहरुख खानला मारुन टाकीन. तेव्हा फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता, मला काही फरक पडत नाही, असे त्याने सांगितले होते. पोलिसांनी हा कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रायपूरमध्ये जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.
५० लाख दिले नाहीत, तर मी त्याला….
मन्नतमध्ये राहणाऱ्या शाहरुखने मला ५० लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला मारून टाकेन. पोलिसांनी त्याला असे का बोलत आहे आणि तुझे नाव काय? असे विचारले असता तो म्हणाला, तुम्हाला लिहायचे असेल, तर माझे नाव हिंदुस्थानी लिहा, असे त्याने म्हटले होते.
फैजानची फोन चोरीला गेल्याची तक्रार
फैजानने २ नोव्हेंबर रोजी खामहर्डीह पोलीस स्थानकात आपला मोबाईल फोन हरवल्याची आणि चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. सिव्हिल लाइन्स सिटीचे पोलिस अधीक्षक (CSP) अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी रायपूर पोलिसांशी फैजान याचा ठावठिकाण्याबाबत संपर्क साधला होता. तो रायपूरच्या पंडरी भागातील रहिवासी असल्याचे आढळून आले. फैजानला पोलिस ठाण्यात बोलावून सांगण्यात आले की धमकी देणाऱ्याने त्याच्या नावावर असलेल्या फोन नंबरचा वापर केला आहे. यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्याने आपला फोन हरवला अथवा चोरीला गेला असल्याचे पोलिसांना सांगितले होते. फैजानने मुंबई पोलिसांकडे संबंधित कागदपत्रेही सादर केली आहेत, असे रायपूरचे एसपी कुमार म्हणाले.
SRK च्या सुरक्षेत वाढ
एका लेखी तक्रारीच्या आधारे शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याला Y+ श्रेणी सुरक्षा दिली होती.