…यामुळं मुंबई तुंबणार,अन् रस्त्यावर खड्डेही पडणार : आदित्य ठाकरे

मुंबई : मागिल ८ ते १० वर्षात नवे रस्ते झाले आहेत तिथे खड्डे पडणार नाहीत. पण ज्याठिकाणी जुने रस्ते आहेत, तसेच अंतर्गत विविध इतर यंत्रणांच्या रस्त्याच्या ठिकाणी मात्र खड्डे पडू शकतात. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणारच नाहीत असा दावा करणार नाही असेही पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. मॉन्सूनपूर्व बैठकीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईतील दरडींवर सुरू असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. खोट बोलणार नाही, मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचणारच असाही खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, मुंबई, दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या नदी पात्रात काही ठिकाणी काम सुरु आहेत. याठिकाणी धोक्याच्या पातळीपेक्षा पाणी जास्त गेल्यास काय उपाययोजना करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरु आहे. मुंबईत २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्याचे प्रकल्प सुरु आहेत. जागतिक पातळीवर ज्या देशात १२ महिने पाऊस पडतो अशा ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते कोणत्या पद्धतीने तयार करतात याचा आढावा आम्ही घेत आहोत.