वयात येणार्या मुलांसाठी आहार

आहारतज्ज्ञ जान्हवी अक्कलकोटकर
जीवनसत्त्व : ऊर्जेची गरज वाढल्यामुळे विटामिन बी वन, विटामिन बी१२, विटामिन बी३ या जीवनसत्त्वांची गरज देखील वाढते, तसेच फॉलिक अॅसिड व विटामिन बी१२ हे जीवनसत्त्वदेखील जास्त प्रमाणात द्यावे लागते. कॅल्शियमच्या शोषणासाठी ड जीवनसत्त्वाची गरज असते. ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी अंडी, मासे, मशरूम, सुकामेवा यांचे सेवन करावे. शरीरात नवीन पेशी तयार होण्यासाठी व त्यांचे कार्य योग्य प्रमाणात जाण्यासाठी जीवनसत्त्व क, ड यांचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा लागतो. या वयातील मुलांच्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांचा समावेश करावा.
खाण्याच्या सवयी किशोरवयीन मुले खाण्याच्या बाबतीत अतिशय निष्काळजी असतात. वेळेवर न जेवणे, एखादे जेवण चुकवणे ही तर त्यांची नित्याची बाब असते. कमी पोषणमूल्य असणारे अन्न खाण्याकडे त्यांचा कल असतो. उदा. बटाटा वेफर्स, फरसाण, शीतपेये हा तर त्यांचा आवडता आहार. त्याचबरोबर पिझ्झा, बर्गर, कचोरी, समोसा असे पदार्थ ते पसंत करतात. या पदार्थांमध्ये कॅल्शियम व जीवनसत्त्वे, प्रथिने यांची कमतरता असते. जे वयामध्ये गरजेचे असते. नको असणारे घटक जसे स्निग्ध पदार्थ, सोडियम, अतिरिक्त उष्मांक असतात. अतिरिक्त तेल, साखर यामुळेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते. मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या बरीचशी कमी असते. त्यांची अॅक्टिविटी बरीच असल्यामुळे अतिरिक्त चरबीचे ज्वलनदेखील होते. पौष्टिक अन्न खाण्याकडे कल असावा. त्याशिवाय शरीराचे योग्य पोषण होऊ शकत नाही. मुलींनी मात्र आहाराची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. फास्टफूडच्या अतिसेवनाने शरीराचे पोषण होत नाही. तो कमी करण्यासाठी क्रश डाएट करतात. त्यामुळे शरीराच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतात. हे एक प्रकारचे दुष्टचक्र आहे. वेळीच लक्षात घेऊन पालकांनी मुलांच्या खाण्या-पिण्याकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे असते. किशोरवयीन मुलं फिल्मस्टार मॉडेल पाहून त्यांचा आदर्श घेऊन विचित्र पद्धतीच्या आहाराचे सेवन चालू करतात. त्याच्यामुळे नुकसान होते व हे नुकसान न भरून काढण्यासारखे असते.
हे खाऊ शकता :
विविध प्रकारची धान्यं : गहू, तांदूळ, बाजरी, मका, नाचणी. डाळी, उसळी, मोड आलेली कडधान्ये, दूध, दही, ताक, लोणी, तूप, बटर, चीज, लस्सी. अंडे, मासे, चिकन (तळलेले नसावे), इडली, डोसा, पोहे, उपमा, शेवयांचा उपमा, घरी बनवलेला ढोकळा.