येरवडा येथे भरली ‘पुणे पुस्तक जत्रा’

पुणे : १९ व्या पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रेला पुण्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पुणेकर रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या क्रीएटी सिटीमध्ये भरलेल्या यंदाच्या या बुक फेअरचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक अशोक कामत यांच्या हस्ते झाले.
पुणे बुक फेअर ही भविष्यात व्यापक चळवळ व्हावी, जीवन मूल्यांचं दर्शन त्यातून घडावे, अशी अपेक्षा अशोक कामतांनी व्यक्त केली. या प्रदर्शनात ४० हून अधिक दालने असून, त्यात देशभरातील नामांकित प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग, जनगणना संचालनालय त्याचबरोबर आकाशवाणी आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यासारख्या सरकारी विभागांची दालने या प्रदर्शनात आहेत.
केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या दालनात २५० हून अधिक विविध विषयांवरील किमान १० हजार पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, तसेच गांधी साहित्य, बालसाहित्य, मान्यवरांची चरित्रे, नेत्यांची गाजलेली भाषणे, असे विपुल साहित्य दालनात उपलब्ध असून, त्यावर १० ते ९० टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे. येत्या १ मे पर्यंत रोज सकाळी १० ते सायं. ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुल राहणार आहे.