“शिंदेंना धनुष्यबाणही मिळणार, मेळाव्यासाठी मैदानही मिळणार आणि सगळंच मिळणार “; नारायण राणे

मुंबई : दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या जल्लोषात होत असतो. मात्र, सध्या शिवसेनेतच फुट पडलेली असल्याने हा मेळावा कोण घेणार यावरून वाद सुरु आहे. शिंदे गटातील नेते आमचीच खरी शिवसेना असून आम्हीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असा दावा करत आहे. तर, शिवसेनेतील नेते देखील दरवर्षी आम्ही दसरा मेळावा घेतो त्यामुळे यावर्षीही आम्हीच घेणार असा दावा करत आहे. सध्या दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेने कोणालाही परवानगी दिलेली नाही. दरम्यान, भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
“दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार. ज्याच्याकडे आमदार जास्त आहेत. ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असून त्यांचाच दसरा मेळावा होईल. मात्र, हा निर्णय अजून महापालिकेकडे आहे. महापालिकेला जे योग्य वाटेल त्यांना दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात येईल.” अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट
उध्दव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या नावाखाली अडीच वर्षे सत्ता उपभोगली. उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना नाहीये, डुप्लिकेट शिवसेना आहे. शिवसेना शब्द त्याला पेलवत नाही. शिवसेना नावाखाली उगाच दुकान चालवलंय इतक्या वर्षे. ज्यांना दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळत नाही ते शिवसैनिक म्हणवून घेत आहेत मला आश्चर्य वाटतंय. त्यांनी आता घरी बसलं पाहिजे. खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. शिंदे यांना मैदानही मिळणार, पक्षाचं नावंही मिळणार, चिन्हही मिळणार सगळं काही मिळणार.
आदित्य ठाकरेचं गद्दार
त्याचं नाव नका ना घेऊ बाबा. लहान लेकरासारखा वागतोय तो. फक्त गद्दार… गद्दार … गद्दार एवढंच बोलता येतं त्याला. त्यांनी स्वतः हिंदुत्वाशी गद्दारी केलीये, मराठी माणसांशी गद्दारी केलीये. त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली होती. यापुढे शिवसेनेला सत्ता मिळणार नाही… उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता मिळणार नाही.