हरियाणात ‘नायब’ सरकार! सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदी शपथ

हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी (Haryana CM Nayab Singh Saini) यांनी आज गुरुवारी (दि.१७) शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंचकुला येथील सेक्टर ५ मधील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला.
१८ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप- एनडीए शासित १८ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, नायब सिंह सैनी यांनी आज शपथविधी सोहळ्याआधी पंचकुलातील मनसा देवी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.
‘यांनी’ घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ
भाजपचे आमदार कृष्णन लाल पनवार, राव नरबीर सिंह, महिपाल ढांडा आणि विपूल गोयल, अरविंद कुमार शर्मा, श्याम सिंह राणा, रणवीर सिंग गंगवा, कृष्णन बेदी यांनी हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजप आमदार आरती सिंह राव, राजेश नागर, गौरव गौतम यांनीही हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
तीन अपक्षांचा भाजपला पाठिंबा
हरियाणातील तीन अपक्ष आमदार सावित्री जिंदाल, राजेश जून आणि देवेंद्र कादियान यांनी भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
हरियाणात भाजपची सत्तेची हॅट्ट्रिक
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हरियाणातील ९० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या. तर काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेची हॅट्ट्रिक करणारा भाजप हा पहिला पक्ष आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या सहा महिनेआधी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
Nayab Singh Saini : नायब सिंह सैनी यांची राजकीय कारकीर्द
माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती म्हणून नायब सिंह सैनी यांची ओळख आहे. नायब सिंह सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात झाला. बीए. एलएलबी असे त्यांचे शिक्षण झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ओबीसी समाजातील नेते, अशीही त्यांची ओळख आहे. ते २००२ मध्ये युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस झाले. २००५ मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हाध्यक्ष होते. सैनी २००९ मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीसही होते. २०१२ मध्ये ते अंबाला भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. २०१४ मध्ये सैनी यांनी नारायणगड विधानसभेतून निवडणूक जिंकली. २०१६ मध्ये त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.