डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचे अव्वल स्थान हुकले, दुसऱ्या स्थानावर मानावं लागलं समाधान
Neeraj Chopra | भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) झुरीच डायमंड लीग (Zurich Diamond League) पुरूष भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान हुकलं आहे. या स्पर्धेत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. नीरज चोप्राचे पहिले दोन प्रयत्न फाऊल ठरले होते. पण नंतर त्यानं 80.79 मीटर लांब भाला फेकत दमदार अशी सुरूवात केली होती.
नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात 85.22 मीटर लांब भाला फेकत जोरदार पुनरागमन केलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यानं फाऊल केला. तसंच 6 व्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजनं 85.77 मीटर लांब भाला फेकत तो अव्वल स्थानाच्या जवळ पोहचला होता. पण त्याला या डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.
दरम्यान, नीरजनं वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. त्यानं पाकिस्तानच्या अर्शद नदीमला जोरदार टक्कर दिली होती . नीरजनं अंतिम फेरीत 88.17 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदक पटकावलं होतं.