द्रष्ट्या डॉ. कमला सोहोनींविषयी…

-श्रीनिवास वारुंजीकर
पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी आणि विज्ञान क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी गोडबोले, समुद्र शास्त्रज्ञ डॉ. अदिती पंत या तारकाच…
डॉ.कमला सोहोनी, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पहिल्या मराठीच नव्हे, तर भारतीय जीवरसायन शास्त्रज्ञ. १९३३ मध्ये प्रथम वर्गात रसायनशास्त्राची पदवी संपादन केल्यावर बंगळुरू येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या संस्थेमध्ये पुढील शिक्षणासाठी अर्ज केला. घरचे वातावरण शिक्षणास पोषक होते, मात्र महिला म्हणून त्यांचा प्रवेश अर्ज या संस्थेने नाकारला. अशा वेळी परिस्थितीला शरण न जाता कमला सोहोनी यांनी त्या विरोधात आवाज उठवला. ज्यामुळे त्यांना वर्षभरासाठी नोबेल पारितोषिकविजेते सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे अभ्यासाची संधी मिळाली. पुढील संशोधनासाठी जेव्हा केंब्रिज विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी इंग्लंडला गेल्या, त्या वेळीही जागा नाही या कारणास्तव प्रथम प्रवेश नाकारला, पण शिक्षणाची प्रखर इच्छा पाहून कमला यांना संधी मिळाली.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुलींनी शिक्षण घेणे तसे नावीन्याचे राहिले नाही. मुलींच्या उच्चस्तरीय शिक्षणालाही आता कौटुंबिक पाठिंबाही मिळू लागला होता. यामुळेच तर आता उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण निश्चितच वाढताना दिसत आहे. विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या मुली पहायला मिळत आहेत.
पण तरीसुद्धा एक मात्र जाणवते. संशोधन करण्यासाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी बुद्धिमत्तेसोबतच जिद्द, चिकाटी गरजेची असते. शिवाय चाकोरीबाहेरच्या एखाद्या कामाचे वेड घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे झपाटलेपण असणे आवश्यक असते. आणि हे सारे गुण म्हणे स्त्रियांमध्येही असतातच. अर्थात असणारच. त्याशिवाय का वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांचे योगदान दिसून येत आहे. पण विविध संस्थांमधील वैज्ञानिकांचे प्रमाण जेमतेम १५-२० टक्के का आहे? संचालकपदी स्त्री वैज्ञानिक जवळपास नाहीतच. एवढेच कशाला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्त्री वैज्ञानिकांची संख्याही अगदी मोजकीच आहे. स्त्रियांच्या कामाचा दर्जा उच्च असतो असे म्हणतात, मग संशोधन किंवा वरच्या पदावर कामासाठी स्त्रियांचे योगदान कमी का दिसते?
कशाला असे प्रश्न पडायला हवेत. आपल्या अशा किती तरी सख्या आसपास दिसतातच की! उच्च शिक्षण घेतले व त्यानंतर संशोधन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जेव्हा स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ येते त्या काळातच वैयक्तिक पातळीवरही नवीन आयुष्याला सुरुवात होत असते. आणि मग जोडीदाराच्या अपेक्षा, लहान मुलाची चाहूल लागणे, त्याचे संगोपन, घरातील ज्येष्ठ व्यक्तींची जबाबदारी असणे अशा गोष्टींनाही सामोरे जावे लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. कमला सोहोनी यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आणि उठावदार असल्याचे दिसून येते.