“मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधायचे सोडून…”, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई: सध्या 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून, याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!” असं ट्वीट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात 30 जुलै 2015 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तसंच या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे.