सुरत रिटर्न आमदार नितीन देशमुखांची चौकशी सुरू असताना अमरावतीत झुकेगा नही सालाचे बॅनर्स
अमरावती | ठाकरे गटाचे नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांची तीन तास चौकशी सुरू होती. तर त्याचवेळी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांची अमरावतीत जोरदार निदर्शनं सुरु होती. नितीन देशमुख यांच्याविरोधात अँटी करप्शन ब्युरोकडून (ACB) चौकशी सुरु होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नितीन देशमुख यांना आज अमरावतीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते हजर होते. अमरावतीत विभागीय कार्यालयाबाहेर पोहोचल्यावर नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. तक्रारदाराची ऑडिओ क्लिप माझ्याजवळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार आहेत. आज 17 जानेवारी रोजी आमदार नितीन देशमुख यांना अमरावती येथे हजर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ते आज सकाळी 10 वाजता अकोला जिल्ह्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीच्या दिशेने मोठं शक्तिप्रदर्शन करीत निघाले. मी तुरुंगात जाण्याच्या तयारीनेच निघालो असून दोन जोडी कपडे सोबत ठेवले आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी नितीन देशमुख यांनी दिली.