नाना पटोलेंच्या ऑफरवर नितीन गडकरींचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी आयुष्यभर…”

नवी दिल्ली | Nitin Gadkari’s Explanation On Nana Patole’s Offer – गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी भाजप पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसंच नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपमध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशा ऑफर त्यांना दिल्या जात आहे. गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान अलीकडेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोलेंनी दिलेल्या या ऑफरबाबत आता नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा स्वयंसेवक आहे. मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
पुढे नितीन गडकरी म्हणाले, “मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी माझ्या विचारांसाठी भाजपमध्ये आलो. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे”.