धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेल्यानंतर आता शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक देखील गेलं

मुंबई | एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून 40 आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाला, असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरु होता. सर्वोच्च न्यायालयात आज एकनाथ शिंदे सरकार घटनाबाह्य आहे की नाही यावर देखील युक्तीवाद सुरु होता. मात्र अचानक संध्याकाळी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हं आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे. या हँडलवर क्लिक केलं की, सध्या रॉक अँड रोल असं नाव दिसत आहे. या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_ असं ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ठाकरे गटाने वेबसाईटबाबतही मोठा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट वेबसाईटच्या नावातही बदल करणार असल्याचं बोललं जात आहे.