‘आता बंटी आणि बबली पोहचलेच आहेत तर…’; संजय राऊतांचा राणा दाम्पत्यावर निशाणा
मुंबई : आज खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांसह शिवसैनिकही सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून शिवसैनिक संतापले आहेत. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या मुंबई दौऱ्यावर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, हनुमान चालीसा वाचणं, हे विषय धार्मिक श्रद्धेचे आहेत. नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. पण भारतीय जनता पार्टीने हे स्टंटे विषय करून ठेवलेत. त्यातली ही पात्रं आहेत. पण लोक ह्यांना गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही हे सगळं मुंबईत साजरं करतो. ह्यांचा जेव्हा हिंदुत्वाशी संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही हिंदू सण साजरे करतो. हे काय आम्हाला शिकवतात?
“आता बंटी आणि बबली पोहोचलेच आहेत तर आम्हाला काही अडचण नाहीये. हे फिल्मी लोक आहेत, ही स्टंटबाजी आहे. मार्केटिंग करणं हेच यांचं काम आहे. भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय हे माहित आहे”. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.