स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी राज ठाकरेंना भेटणार

मुंबई : येत्या रविवारी म्हणजेच १६ ऑक्टोबर पासून सुरु होणारा टी २० विश्वचषक हा मराठीतही प्रक्षेपित का करत नाही? या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारले होते. स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आणि मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आज, शुक्रवारी १४ ऑक्टोबरला आंदोलन करणार होती मात्र तत्पूर्वीच आता स्टार स्पोर्ट्सच्या अधिकाऱ्यांनी समजुतीचा सूर धरला आहे. विश्वचषक मराठी प्रक्षेपणाच्या संदर्भात उद्या स्टार स्पोर्ट्सचे प्रशासकीय अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मुंबईकरांच्या नसानसात क्रिकेट भिनले आहे, महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षक विश्वचषकासाठी स्टार स्पोर्ट्स पाहणार आहेत. जर स्टार स्पोर्ट्स इतर प्रादेशिक भाषांना महत्त्व देऊ शकते तर मराठीलाच दुय्यम वागणूक का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांनी केला होता. यावेळी अन्य भाषांबाबत आम्हाला आक्षेप नाही मात्र मराठीलाही योग्य स्थान द्यावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. यावर आता स्टार स्पोर्ट्सच्या वतीने पुढाकार घेऊन चर्चेची तयार दाखवण्यात आली आहे. उद्या स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रो कबड्डीचे प्रक्षेपणही मराठीत करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर व राज ठाकरेंच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनी कबड्डीच्या मराठी प्रक्षेपणासाठी आंदोलन केले होते. आता टी २० विश्वचषकही मराठीत दाखवण्याच्या मागणीला स्टार स्पोर्ट्स तयार होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.