गणेशोत्सवानिमित्त काँग्रेस भवनात ‘वाती ते मूर्ती’ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : गणेशोत्सवासाठी ‘वाती ते मूर्ती’ असे प्रदर्शन काँग्रेस भवनात दि. २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाच्या संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
‘राष्ट्रसंचार’च्या कार्यालयाला बुधवारी संगीता तिवारी यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची प्रदर्शनात माफक किमतीत विक्री होणार आहे.
कोरोना साथीच्या काळात ज्या महिलांनी आर्थिक नुकसान सोसले अशा गरजूंच्या बचत गटांना प्रदर्शनात संधी देण्यात आली आहे. एकूण ७० स्टॉल या प्रदर्शनात असतील. एक स्टॉल अपंगांसाठी ठेवण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात या गरजूंना आर्थिक मदत मिळावी यादृष्टीने त्यांच्या स्टॉल्सना सर्वांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन तिवारी यांनी केले.
प्रियदर्शिनी वुमन फोरमच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात येते. प्रदर्शनाचे यंदाचे १३वे वर्ष आहे. प्रदर्शनातील वस्तू या महिलांनी अत्यंत मन लावून तयार केल्या आहेत, असे तिवारी यांनी सांगितले. शनिवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी चाराल काँग्रेस भवन येथे प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. ‘राष्ट्रसंचार’चे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे यांनी संगीता तिवारी यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.