“पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा”

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थिती आहे. तसंच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर या बैठकीत शहरांच्या नामांतरांचा देखील एक प्रमुख मुद्दा राहणार असल्याचं समोर येत आहे.
आजच्या या बैठकीत पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसंच शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे दोन मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे बैठक सुरू होण्याअगोदरच बैठकीतून निघून गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ते बैठकीतून निघून का गेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.